विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण केला आहे. शिवसेना कोणी फोडली याची कोनाकोपऱ्यात माहिती आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी खूप उशीरा आपल्याला मशाल हे चिन्ह मिळाले. मात्र, आपल्या शिवसैनिकांनी ही मशाल घराघरात पोहचवली आणि याच मशालीने आपण दिल्लीश्वरांच्या बुडाला आग लावली, असेही ते गरजले.
वाशिम व दिग्रस येथील डॉ. सिध्दार्थ देवळे, ॲड. सुधाकर देशमुख यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत आपला विजय निश्चित असून आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन शिवसैनिकांना केले.
लोकसभा निवडणुकीत काही जणांनी मशाल या चिन्हावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काहीजणांनी केला. मात्र, आता हे चिन्ह घराघरात पोहचले आहे. त्यामुळे लोकसभेला मिळालेल्या मताधिक्यांपक्षा जास्त मते आपल्याला या विधानसभा निवडणुकीत मिळवायची आहे. त्यामुळे सर्व शिवसैनिकांनी आतापासूनच कामाला लागावे, विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच आहे, असे विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.