कश्मीर आणि मणिपुरातील लोकांचे जीव जात असताना विजयाचे ढोल काय वाजवता? उद्धव ठाकरे यांचा घणाघाती हल्ला

जबाबदारी पेलता येत नसेल तर मोदींना पंतप्रधानपदावर राहण्याचा अधिकार नाही

”वर्षभरानंतर मणिपूरवर मोहन भागवत बोलले हे सुद्धा काही कमी नाही. मणिपूर जळतंय याच्या झळा आता तरी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात, परंतु भागवत जे बोलले आहेत ते पंतप्रधान मोदी गांभीर्याने घेणार आहेत का?”

”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरने भाजपला खडेबोल सुनावले आहेत; पण त्याआधी देशातील मतदारांनीसुद्धा भाजपला खडे चारलेले आहेत. असं खडेखडे सगळं चारल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे का?”

टेकूवर स्थापन झालेले केंद्र सरकार शपथविधीचे सोहळे साजरे करीत असताना कश्मीरात तीन दिवसांत तीन भयंकर हल्ले झाले. मणिपूरही पेटलेलेच आहे. त्यामुळे कश्मीर, मणिपूरमध्ये निरपराध लोकांचे नाहक जीव जात असताना तिसऱया विजयाचे ढोल कसले बडवता, असा जबरदस्त आसुड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ओढला. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा आतातरी कश्मीर, मणिपूरमध्ये जाऊन शांततेसाठी प्रयत्न करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदप्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नव्या केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला. ‘एनडीए’ सरकारच्या शपथविधीचे सोहळे होत असताना कश्मीर, मणिपूर जळत आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदी आणि ‘एनडीए’ सरकारला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. यावरून उद्धव ठाकरे यांनी ‘एनडीए’चा समाचार घेतला.

निवडणुकीआधी ‘चारसो पार’चा नारा देणारे कश्मीर-मणिपूरमध्ये ‘बार बार’ हल्ले होत असताना कुठे गेलेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपने निवडणुकीआधी 370 कलम हटवल्याचे सांगत जोरदार प्रचार केला, मात्र याचा कश्मिरींना काय फायदा झाला हे सरकारने सांगावे असे आव्हानही त्यांनी दिले. कारण कश्मीरमध्ये अजूनही जीव जात आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 370 कलम अजूनही ‘होल्ड’वर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘मोदी’ सरकारचे आता ‘एनडीए’ झाले!

लोकांचे नाहक बळी जात असताना सरकार शपथविधी कार्यक्रमाचे रेकॉर्ड करण्यात गुंतले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ‘चारशे पार’चा नारा देणारे ज्या पद्धतीने मारून मुटकून 240 वर अडकलेत त्या ‘मोदी सरकार’चे आता ‘एनडीए’ सरकार झाल्याचेही त्यांनी सांगितले. भाजप नेते नड्डा यांनी तर निवडणुकीआधी आम्हाला आता संघाची गरज नसल्याचे जाहीर विधानच केले आहे. म्हणजेच भाजपचा पाया मानल्या जाणाऱया संघाची आता त्यांना गरज संपलीय, असे ते म्हणाले.

म्हणून जग हळहळलं!

मोदींचं मताधिक्य कमी झाल्याने जग हळहळलं असं भाजप नेते म्हणत आहेत, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता जग हळहळलं हे खरं आहे पण ते एवढं तरी मताधिक्य का मिळालं, म्हणून हळहळलं आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

सरकारशी देणेघेणे नाही, मला देशाच्या भवितव्याची काळजी!

निवडणुकीत मतदारांनी भाजपला धडा शिकवला. त्यांचेच ‘ऑर्गनायझर’ आणि भागवतांसारख्या ज्येष्ठ नेत्याने व्यथा मांडली. असे असताना भाजप आता तरी सुधारणार का? की अजूनही देशातल्या प्रतिपक्षांना संपवण्याच्या मागे लागणार की देशावरील संकटे दूर करण्यासाठी प्रयत्न करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. देशातील प्रतिपक्ष नागरिकांचे प्रश्न विधानसभेत, लोकसभेत मांडतात. त्यांच्या मागे जर सरकार लागत असेल तर हे सरकार कुचकामी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मला सरकारशी देणेघेणे नाही. मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रधानमंत्री, गृहमंत्री आता तरी कश्मीर, मणिपूरमध्ये जाणार का?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी सरकारने मणिपूरकडे लक्ष द्यायला पाहिजे असे विधान केले. वर्षभरानंतर का होईना मणिपूरच्या झळा संघापर्यंत पोहोचल्या. ही संदेशवहन यंत्रणा त्यांनी सुधारली पाहिजे. मात्र संघाने कान टोचले असले तरी सरकार गांभीर्याने घेणार का, असा सवालही त्यांनी केला. ‘ऑर्गनायझर’ या आरएसएसच्या मुखपत्राने भाजपला खडे बोल सुनाकले आहेत. देशातील मतदारांनीही लोकसभा निकडणुकीत भाजपला ‘खडे चारले’ आहेत. असे खडे चारल्याकर आता तरी भाजप सुधारणार आहे का? सरसंघचालक मोहन भागकत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने त्यांची क्यथा मांडल्यानंतर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा कश्मीर, मणिपूरमध्ये जाणार का, असा सवालही त्यांनी केला.

शिवसेना विधान परिषदेच्या तीन जागा लढणार

शिवसेना विधान परिषदेच्या चारपैकी तीन जागा लढविणार आहे. मुंबई पदविधरमधून ऍड. अनिल परब, मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून संदीप गुळके शिवसेनेचे उमेदवार आहेत.

नाशिकमधून काँग्रेसची माघार

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून काँगेसचे दिलीप बापुराव पाटील, अपक्ष राजेंद्र विखे-पाटील यांच्यासह पंधरा जणांनी माघार घेतली. यामुळे निवडणूक रिंगणात आता 21 उमेदवार आहेत.