वाजतगाजत… गुलाल उधळत या! शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा दणक्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसाच. यंदाचा दसरा मेळावा मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता शिवतीर्थावर दणक्यात साजरा होणार असून राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱयातून शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी वाजतगाजत, गुलाल उधळत या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करणार असून विधानसभेतील शिवसेनेच्या निर्विवाद विजयाचे रणशिंग यावेळी फुंकले जाणार आहे. त्यामुळे यंदाची विजयादशमी ही खऱया अर्थाने ‘विजया’दशमी असणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा. याच मेळाव्यात लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात आणि राज्याच्या, देशाच्या राजकारणाला दिशा मिळते. प्रथा आणि परंपरेनुसार मेळाव्यात शस्त्र्ापूजन केले जाते. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत यंदाचा मेळावा साजरा होणार असल्याने शस्त्रपूजनाकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व शिवसेना नेते, उपनेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019
स्थळ – शिवतीर्थ, दादर
वेळ – सायंकाळी 5 वा.