शिवसैनिकांची थेट मनगुत्तीतच धडक, ‘शिवछत्रपती’ पुतळा अवमान प्रकरणी गावातच शासन-प्रशासनाला ठणकावले

653

शिवछत्रपतींचा पुतळा मनगुत्ती (बेळगाव, कर्नाटक) मध्ये जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या हस्तक्षेपानुसार हलविला गेला. या संतापजनक कृतीच्या पार्श्वभूमीवर, गडहिंग्लज परिसरातील शिवसैनिकांनी सहसंपर्कप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली तडक मनगुत्ती गाठूले आणि स्थानिक ग्रामस्थांना पाठिंबा देत धीर दिला. शिवसैनिकांच्या या तत्पर कृतीमुळे मनगुत्तीकरांना धीर आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमामानाबाबत माहिती मिळताच गडहिंग्लज शिवसेना कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.8) सायंकाळी उशीरा मनगुत्ती गाठले. कारण अशा निकराच्या स्थितीत केवळ त्रयस्थपणे संताप व्यक्त करण्यापेक्षा तेथील ग्रामस्थांना धीर देणे गरजेचे होते. रात्रीचा काळोख, पावसाची रिपरिप, तणावपूर्ण वातावरणातील ग्रामस्थांचा अबोला आणि असंवेदनशील प्रशासन असलेल्या स्थितीत धावून आलेल्या शिवप्रेमींमुळे ग्रामस्थांना हायसे वाटले. तरीही गावात अगदी तुरळकपणे ग्रामस्थ दिसत होते. या पार्श्वभूमीवर, गावामध्ये शुक्रवारीच शिवपुतळा प्रतिष्ठापित केलेला असतानाही तो रातोरात हलविण्याची कृती केलेल्या प्रशासनाचा तातडीने निषेध नोंदविण्यात आला. मात्र तेथील वातावरणाच्या दडपणामुळे कोणीही ग्रामस्थ काहीही बोलण्याच्या मानसिकतेत नव्हता. अनेकांच्याकडे विचारणा केल्यावर नेमकी स्थिती समजली.

यावेळी प्रा. शिंत्रे म्हणाले, पुतळा अवमानाबाबत गावाचा संताप रास्त आहे. कर्नाटकातील मराठी द्वेष्ट्या शासनाने केवळ पुतळा न हटवता शिवछत्रपतींसह मराठीजनांचा अपमान केला. या अन्याय्य कृतीविरुद्ध शिवसेना मैदानात उतरली असून कर्नाटक सरकारने मराठी माणूस आणि शिवछत्रपतींच्या अस्मितेला डिवचू नये. शिवभक्तांच्या व सीमाभागातील मराठी माणसाच्या भावना लक्षात घेऊन सन्मानाने शिवपुतळा प्रतिष्ठापित करावा. अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल, असे ठणकावण्यात आले. गडहिंग्लजकर शिवप्रेमींच्या या आवेशामुळे मनगुत्तीकर शिवभक्तांच्या मात्र जीवात जीव आला. यावेळी गडहिंग्लजकरांसह परिसरातील असंख्य शिवप्रेमी-कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या