कोरड पडली घशाला.. लाज नाही प्रशासनाला; पाण्यासाठी उल्हासनगरात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा

ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीमध्ये तब्बल 200 टक्क्याने वाढ केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणीच पळाले असून या भरमसाट दरवाढीचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उल्हासनगर महापालिका मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनामध्ये उल्हासनगरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

पालिकेने केलेली भरमसाट वाढ रद्द करावी यासाठी आज शिवसेनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ‘कोरड पडली घशाला.. लाज नाही प्रशासनाला’ अशा आशयाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच प्रशासनाला सुबुद्धी मिळू दे, असे साकडे घालत मुख्यालयासमोर होमहवनदेखील करण्यात आले. या आंदोलनात कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, कल्याण जिल्हा युवाधिकारी भाऊ म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, शहरप्रमुख कुलविंदर सिंग (बिंदर) बैस, म्हारळ शहरप्रमुख भाऊ चौधरी, महानगरप्रमुख राधाचरण करोतिया, महिला आघाडी संघटक जया तेजी, उपसंघटक सुनिता गव्हाणे, कल्याण उपजिल्हा युवाधिकारी राजेश कणसे, उपशहरप्रमुख शेखर यादव, दिलीप मिश्रा, राजू माने, शिवाजी जावळे, राजन वेलकर, सुरेश पाटील, शहर युवाधिकारी महेश फुंदे, विभागप्रमुख दशरथ चौधरी, रवी दिवटे, परमानंद गेरेजा, प्रकाश माळी, उपविभागप्रमुख आदिनाथ पालवे, सुरेश देशमुख आदी सहभागी झाले होते.