महाड-दापोली मार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; 29 प्रवासी बचावले, सातजण गंभीर जखमी

पुण्याहून दापोलीला जाणाऱ्या शिवशाही बसला आज सकाळी महाड-दापोली मार्गावर भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला बस झाडाला आदळून तिचे चाक गटारात रुतले. या दुर्घटनेत सातजण गंभीर जखमी झाले असून 29 प्रवासी दैवबलवत्तर म्हणून बचावले आहेत. दरम्यान शिवशाही बसला झालेल्या या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश एसटी महामंडळाने दिले आहेत. शिवशाही बसला वारंवार होणाऱ्या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमींना महाडच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे.

महाडपासून 15 किमी अंतरावर असलेल्या रेवतळे फाट्याजवळ आज हा अपघात झाला. पुण्याहून दापोलीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या शिवशाही बसचालकाने समोरून येणाऱ्या एका कारचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने अचानक ब्रेक दाबल्याने बसचा ताबा सुटला आणि शिवशाही थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर आदळली. या झाडाजवळच असलेल्या गटारामध्ये बसची पुढील चाके अडकली.

शिवशाही बसच्या या अपघातामध्ये सात प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे – रियाज हरसिलकर (बोरोंडी), समीक्षा सारंगे (पुणे), निलोफर हरसिलकर (बोरोंडी), मनीषा महाडिक (हर्णे), नूरजहाँ हरसिलकर (दापोली), शैरीश माटवनकर (महाड), शमशा माटवनकर (महाड). अपघाताचे वृत्त समजताच महाड आगाराचे व्यवस्थापक फुलपगारे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन प्रवाशांसाठी पर्यायी एसटी बसची व्यवस्था केली.

15 दिवसांत 17 घटना
महाड-दापोली मार्गावरील रेवतळे फाट्याजवळ आंग्रेकोंड नावाचे गाव असून रस्त्याचा तीव्र उतार आणि निसरडा भाग यामुळे तो अपघाताचा स्पॉट बनला आहे. गेल्या 15 दिवसांत याच ठिकाणी एकूण 17 अपघात झाले आहेत. येथील रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी एसएमसी कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. एप्रिल महिन्यात या रस्त्यावर फक्त डांबर व ग्रीट टाकण्यात आले. त्यामुळे हा रस्ता निसरडा बनला आहे.