
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱया म्हाडालाच आता 726 घरांची लॉटरी लागली आहे. ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर धोकादायक इमारतीमधील गरजू कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाने म्हाडाला ही घरे दिली आहेत.
शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाची ही घरे मुलुंड, भांडुप, कुर्ला, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली आणि बोरिवली अशा 16 विविध ठिकाणी आहेत. यातील 300 चौरस फुटांची 34 घरे वगळता इतर सर्व घरे 225 चौरस फुटांची आहेत. शिवशाहीकडून म्हाडाला ही घरे विनामूल्य देण्यात आली असून अनेक वर्षे धूळ खात असलेल्या या घरांची डागडुजी म्हाडालाच करावी लागणार आहे. परत करण्याच्या अटीवर ही घरे गरजूंना विनामूल्य देण्यात येणार आहे.
दीडशे कुटुंबीयांचे स्थलांतर
आपत्कालीन परिस्थितीत गरजू कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून आम्हाला 726 घरे मिळाली आहेत. त्यातील दीडशे घरांमध्ये गरजूंचे स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती म्हाडाच्या एका अधिकाऱयाने दिली.
घुसखोरी रोखण्याचे आव्हान
म्हाडाच्या संक्रमण शिबिरात मोठय़ा प्रमाणात घुसखोरी होते. घुसखोरांना बाहेर काढणे ही म्हाडासाठी मोठी डोकेदुखी ठरते. त्यातच आता शिवशाहीकडून मिळालेली शेकडो घरे सांभाळण्याचे आणि त्यातील घुसखोरी रोखण्याचे मोठे आव्हान म्हाडापुढे असणार आहे.