
मुंबई शहरातील सहा बिल्डरांनी शिवशाही पुनर्वसन प्राधिकरणाचे तब्बल 96 कोटी रुपये भाडे थकवले आहे. दंडाची रक्कम भरण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत 30 जूनला संपत आहे. तरी सहापैकी पाच बिल्डरांनी अद्यापही थकीत रक्कम भरलेली नाही. दिलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास संबंधित बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा शिवशाहीने दिला आहे.
झोपड्यांचा पुनर्विकास करताना बिल्डर तेथील रहिवाशांना संक्रमण शिबिरात घरे देतात. त्यासाठी शिवशाही पुनर्वसन प्राधिकरणाकडून संक्रमण शिबिरे भाडे तत्त्वावर घेतात. 40 हजार रुपये डिपॉझिट आणि 7 हजार रुपये भाडे एका घरासाठी आकारले जाते. मात्र बिल्डरांनी अनेक वर्षे भाडे भरले नसल्याने थकबाकी 116 कोटींवर गेली आहे.
थकीत भाडे वसूल करण्यासाठी शिवशाहीने संबंधित बिल्डरांना कारणे दाखवा नोटीस बजावली. कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने भाडे थकल्याचे काही बिल्डरांनी सांगितले तर काही बिल्डरांनी थकीत रकमेवर लावल्या जाणाऱ्या व्याजाचा दर कमी करण्याची मागणी केली. त्यानुसार 16 टक्के दंड 8 टक्क्यांवर आणि वार्षिक वाढ दहा टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर आणली. तरीदेखील बिल्डरांचे भाडे थकीत आहे.
बिल्डरांच्या मालमत्तांवर टाच आणणार
बिल्डरांनी दिलेल्या मुदतीत पैसे न भरल्यास दंडाची रक्कम आधी एवढीच ग्राह्य धरली जाईल. अभय योजनेअंतर्गत दिलेली सूट नंतर लागू होणार नाही. तसेच जिल्हाधिकारी यांची मदत घेऊन भाडे थकविणाऱ्या बिल्डरांच्या मालमत्तांवर टाच आणली जाईल, असा इशारादेखील अधिकाऱ्याने दिला.





























































