शिवशाहीत घामाघूम झालेल्या प्रवाशाला पाच हजारांची भरपाई, ग्राहक न्यायालयाचे आदेश

1381

जालना जिह्यातील ग्राहक न्यायालयाने ‘शिवशाही’ बस मधून प्रवास करणार्‍या एका प्रवाशाला पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहेत. प्रवासादरम्यान मोबाईल चार्ंजग पॉइंट आणि एसीची सुविधा न मिळाल्याने घामाघूम झालेल्या प्रवाशाने महामंडळाविरोधात ग्राहक न्यायालयाकडे धाव घेतली होती. शिवशाहीत या दोन्ही सुविधा उपलब्ध असल्याची जाहिरात महामंडळाने केली होती, मात्र प्रत्यक्षात प्रवासादरम्यान या सुविधा न मिळाल्याची प्रवाशाची तक्रार होती.

सतीश दायमा असे तक्रारदार प्रवाशाचे नाव असून याच वर्षी 12 जुलैला ते जालना ते संभाजीनगर असा शिवशाही बसने प्रवास करीत होते. प्रवासावेळी त्यांच्या मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे त्यांनी बसवाहकाला मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंट उपलब्ध करून देण्याची मागणी केली, पण बसमधील चार्जिंग पॉइंट आणि एसीमध्ये बिघाड असल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी दायमा यांनी बसवाहक आणि चालकांकडे तक्रारवहीची मागणी केली असता बसमध्ये तक्रारवहीदेखील नव्हती. त्यामुळे दायमा यांनी एसटी महामंडळाविरोधात अखेर जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेऊन या गैरसुविधेमुळे झालेल्या मनस्तापासाठी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

एका महिन्याच्या आत नुकसानभरपाई

दायमा यांच्या तक्रारीवर सुनावणी करताना ग्राहक न्यायालयाच्या अध्यक्षा नीलिमा संत आणि सदस्या नीता कनकारिया आणि मंजुषा चितलांगे यांनी दिलेल्या आदेशात जालना एसटी डेपोने एका महिन्याच्या आत दायमा यांना पाच हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे म्हटले आहे.  

एसटी महामंडळाच्या जाहिरातींवर प्रश्नचिन्ह

दायमा यांनी केलेल्या तक्रारीनुसार शिवशाही बसच्या जाहिरातीत बसमध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट आणि एसीची सुविधा असल्याचे म्हटले आहे. त्याप्रमाणे एसटीकडून भाडेही आकारण्यात आले आहे पण प्रत्यक्षात या दोन्ही सुविधा बसमध्ये प्रवासावेळी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करीत दायमा यांनी या जाहिरातीवरच प्रश्नचिन्ह उभे केले.

आपली प्रतिक्रिया द्या