लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी; 2,289 महिलांना योजनेतून वगळले, आदिती तटकरेंची माहिती

निकषात बसत नसतानाही ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ घेणाऱ्या लाखो महिलांना सरकारकडून आजपर्यंत अपात्र ठरवण्यात आले आहे. आता यामध्ये आणखी एक नवी धक्कादायक बाब उघड झाली आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये 2,289 लाडक्या बहिणी या सरकारी कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलांना आता योजनेतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ गरीब व गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली. सरकारी नोकरी असलेल्या महिलांना त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असा स्पष्ट निकष होता. त्यानंतरही सरकारी नोकरी करणाऱया 2,289 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र आता त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे.