
लष्करप्रमुख जनरल द्विवेदी व त्यांची पत्नी सुनीता द्विवेदी यांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली. एका सैनिकाच्या मृत्यूनंतरही तो समाजकल्याणसाठी उभा असतो असा संदेश यामागे असल्याचे लष्करप्रमुख म्हणाले.
एक कोटी तक्रारींचे निवारण; केंद्र सरकारचा दावा
विविध सरकारी विभागांच्या माध्यमातून सेंट्रलाइज्ड ग्रीव्हेन्स अँड मॉनिटरिंग सिस्टम या अॅपद्वारे 1.2 कोटींहून अधिक लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले, अशी माहिती माहिती केंद्र सरकारने आज लोकसभेत दिली.
ईडीची पंजाबमध्ये 8 ठिकाणी छापेमारी
ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने पंजाब आणि चंदीगडमध्ये तब्बल 8 ठिकाणी छापेमारी केली. मेसर्स वाहिद संधार शुगर्स लिमिटेड आणि संबंधित कंपन्या तसेच मालकांविरोधात मनी लॉन्डरिंग कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
सुरतमध्ये मालकानेच रचला हिरेचोरीचा बनाव
सुरत येथे मालकानेच आपल्या तब्बल 32 कोटींच्या हिरेचोरीचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. पंपनीचा मालक देवेंद्र पुमार याने विम्याची रक्कम हडपण्यासाठीच हे षड्यंत्र रचले. यात आपली दोन मुले, वाहनचालक आणि इतर दोघांना सहभागी करून घेतले.
मंत्र्याच्या बंगल्याजवळ सापडली मतदार ओळखपत्रे
केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या सरकारी बंगल्याजवळ 43 मतदार ओळखपत्रे सापडली. यातील अनेक ओळखपत्रे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती. मतदार ओळखपत्रांबाबतची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.
अवधूत साठे शेअर इन्स्टिटय़ूटवर आयकर विभागाची धाड
कर्जत तालुक्यातील कडाव भोईरवाडी परिसरात असलेल्या अवधूत साठे यांच्या गुरुकुल शेअर मार्केट ट्रेनिंग इन्स्टिटयूट वर आज आयकर विभागाने अचानक धाड टाकली. प्राथमिक माहितीनुसार, येथे होत असलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत आयकर विभागाकडे शंका व्यक्त करण्यात आली होती. यानंतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कार्यालय व ठिकाणांची झडती घेतली.