
हिवाळ्याची चाहूल लागताच चिलिका शहर पक्ष्याच्या किलबिलाटाने गजबजले आहे. आशियातील हा सर्वात मोठा खाऱ्या पाण्याचा सरोवर आहे. या विस्तीर्ण सरोवरात पन्नासहून अधिक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आले आहेत. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हिवाळ्यातील सुरक्षित आश्रयस्थान अशी चिलिका सरोवराची ओळख आहे. कॅस्पियन प्रदेश, सैबेरिया आणि आग्नेय आशिया अशा दूरच्या प्रदेशातून पक्षी येतात.
ट्रेडिंग ऍपवर 2.90 कोटींचा गंडा
श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवून आणि फेसबुकवर मैत्री करून एका सायबर गुन्हेगार महिलेने नोएडातील व्यावसायिकाला तब्बल 2.90 कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडून हा मोठा सायबर फ्रॉड करण्यात आला. सेक्टर-11 मध्ये राहणारे आणि ग्रेटर नोएडा येथे पुठ्ठा उत्पादन कारखाना चालवणारे व्यापारी नितिन पांडे यांची फसवणूक झाली.
चेंडू शोधायला गेले अन् झाडीत सापडली स्फोटके
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या आत्मघाती बॉम्ब स्फोटानंतर देशभरातली सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. दिल्ली बॉम्बस्फोटाआधी हरयाणातून तब्बल 2900 किलो स्फोटके जप्त करण्यात आली होती. आता उत्तराखंडमधील अल्मोडा जिह्यातील डाबरा येथील सरकारी शाळेजवळ झाडीमध्ये स्फोटके सापडल्याने खळबळ उडाली आहे. डाबरातील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू शाळेजवळील झाडीत गेला. चेंडू शोधत असताना मुलांना झाडीत स्फोटके आढळली. मुलांनी याची माहिती तत्काळ मुख्याध्यापकांना दिली. मुख्याध्यापकांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली.
नायजेरियात 300 मुलांचे अपहरण
नायजेरियातील एका कॅथोलिक शाळेतून 300 हून अधिक मुलांसह कर्मचाऱयांचे अपहरण करण्यात आले आहे. सुरुवातीला ही संख्या 227 इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र आता हे देशातील आजवरचे सर्वात मोठे सामूहिक अपहरण असल्याचे म्हटले जात आहे. ख्रिश्चन असोसिएशन ऑफ नायजेरियाने या घटनेची माहिती देताना सांगितले की, राज्यातील सेंट मेरी स्कूलमधून अपहरण केलेल्यांचा आकडा 315 पर्यंत वाढला आहे. आता 303 विद्यार्थी आणि 12 शिक्षकांचा समावेश आहे. नायजेरियामध्ये सशस्त्र गट आणि इस्लामी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असताना अपहरणाच्या घटनेने खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिश्चनांवर केलेल्या वागणुकीवरून लष्करी कारवाईची धमकी दिल्यानंतर हे सामूहिक अपहरणाची घटना घडली आहे.

























































