संस्कृती सोहळा – श्रावणाचं सौभाग्यलेणं

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

खरं तर आषाढ सरला की, श्रावण  महिन्याची चाहूल लागते ती निसर्गाच्या रूपाने. हिरवा शालू नेसलेल्या निसर्गाचा नयनरम्य आविष्कार अनुभवायला मिळतो. निसर्गातील ऊनपावसाचा खेळ मनामनांतील उत्साह वृद्धिंगत करतो. श्रावण महिन्यात सृष्टीचा आसमंत उजळून निघतो. त्यामुळे सृष्टीच्या बदलाचा आनंद समाजमनात ओसंडून वाहत असतो.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे 

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे 

आजही श्रावण महिन्याचे स्वागत करताना आबालवृद्धांना बालकवींच्या या काव्यपंक्ती हमखास आठवतात. वातावरणातील आल्हाददायक बदल आणि पशुपक्षी श्रावण महिन्याची वर्दी देतात. श्रावण म्हणजे सण, उत्सवांची रेलचेलच. गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि सगळ्याच लहानमोठय़ा महिला वर्गाचा अत्यंत जिव्हाळ्याचा, मायेचा, आपुलकीचा सण म्हणजे नागपंचमीचा! खरं तर आषाढ सरला की, श्रावण  महिन्याची चाहूल लागते ती निसर्गाच्या रूपाने. हिरवा शालू नेसलेल्या निसर्गाचा नयनरम्य आविष्कार अनुभवायला मिळतो. निसर्गातील ऊनपावसाचा खेळ मनामनांतील उत्साह वृद्धिंगत करतो.

श्रावण महिन्यात सृष्टीचा आसमंत उजळून निघतो. त्यामुळे सृष्टीच्या बदलाचा आनंद समाजमनात ओसंडून वाहत असतो. श्रावण सुरू झाला की, जनमन आतुर होते ते पाचव्या दिवशी येणाऱया नागपंचमीच्या सणासाठी. आमच्या लहानपणी आषाढ संपता संपताच दारावर “नागोबाला दूध” अशी गारुडी लोकांची हाळी ऐकू यायला सुरुवात व्हायची. प्रत्यक्ष जिवंत नागराज पाहणे म्हणजे एक वेगळा अनुभव असायचा. त्याला दूध, लाह्या अर्पण करून भीत भीतच नागोबाचं दर्शन घेतलं जायचं.

नागपंचमीच्या सणाला आणि श्रावणतल्या सणांना सासुरवाशिणी माहेरघरात यायला सुरुवात व्हायची. त्यासाठी दुरडय़ा भरून शिदोरी घेऊन मुराळी धाडले जायचे. गल्लीतल्या आयाबाया अंगणात रांगोळी काढून आणि हात ओल्या मेंदीने रंगवून सासुरवाशिणीच्या स्वागतासाठी उत्साहाने मायेच्या पायघडय़ा घालून वाटेकडे डोळे लावून बसायच्या. गावात गल्लीत मोठमोठय़ा झाडांना भक्कम दोरखंडाने झोके बांधले जायचे. बैत्याचा कासार दारात येऊन राजवर्खी रंगीबेरंगी हर नमुन्याची शोभिवंत काकणं घेऊन दत्त व्हायचा. सासुरवाशिणींसह माहेरवाशिणींचेही  हात भरगच्च कंकणाने शोभिवंत व्हायचे.

हौसेला मोल नसते असं म्हणतात, ती हौस भागवली जायची. त्यात मोठं समाधान असायचं.

आली आली गं पंचमी, बारा मुलखात डंका वाजवी 

मुराळी आला गं भाऊ माझा, गूज मनीचे सांगते त्याला

बारा सणाला नको नेऊ, नागपंचमीच्या सणाला नको ठेवू 

अशी सासुरवाशिणीच्या अंगात पंचमी संचारत असायची. 

सासुरवाशिणीला घेऊन बंधू मुराळी माहेरी येतो. माहेरची माणसं बघून सासुरवाशिणीचे मन हरखून जायचे, आनंदाने ती  बेहोश होऊन जायची. सयांनी अंगण फुलायचं. सासरकडच्या गोष्टी ऐकायला कान टवकारले जायचे. हास्यविनोद रंगायचे. घोळामेळाने झिम्मा, फुगडीचा फेर घुमू लागायचा. दारासमोरची अंगणे दणाणून जायची. सयांसोबत फुगडय़ा खेळताना आपसूकच ओठांवर शब्द यायचे…

फुगडी खेळू दणादणा। रुपये मोजू खणाखणा। 

बाभळीचं झाड, माझा कंबरपट्टा लाल। 

मेंदीचं झाड, माझी पाची बोटं लाल।। 

दारात उखाण्यांची जुगलबंदी रंगायची. 

पंचमीचा खेळ उतररात्री रंगत जायचा. 

सईबाईचा कोंबडा, आला माझ्या दारी 

रावांची मिजास, पंचमुलूख सारी… 

उखाण्यांची जुगलबंदी रंगली आणि ही चढाओढ संपली की, पिंगा घुमायचा… 

पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा गं, पोरी पिंगा। 

तुझ्या पिंग्यानं मला बोलावली, रात घालवली, पोरी पिंगा। 

फेटा बांधल्याला भाऊ माझा गं जावई तुझा।

गं पोरी पिंगा…। 

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा । 

शालू नेसल्याली भैन माझी गं, सून तुझी गं, पोरी पिंगा। 

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा। 

भाऊ माझा गं, तो गं राजा गं, अगं जा जा गं पोरी पिंगा। 

तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा। 

तुझ्या भावाचं डोळं चकणं गं, रूप हेकणं गं पोरी पिंगा। 

भैन माझी गं लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा। 

 यंदाच्या लगीनसराईत हात पिवळं झालेल्या एखाद्या नव्या सासुरवाशिणीला रिंगणात घेऊन `खुर्ची का मिरची?’ असा सवाल टाकून तिला कोडय़ात टाकलं जायचं. सयाबाया थट्टा करायच्या आणि ` जाशील कैसी?’ उत्तर मागायच्या. अर्थात ही न संपणारी कोडय़ाची उत्तरे मिळत नाहीत म्हटल्यावर मग तिला गोड शिक्षा दिली जायची, ती म्हणजे तिच्या नवऱयाचे नाव घेण्याची. तीही लाजत मुरकत उखाणा घ्यायची. मग उखाण्यांची चढाओढ सुरू व्हायची…

महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून,…रावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून

उपस्थित महिलांपैकी जुन्या वळणाची एखादी बाई नाव घेताना देवालाही त्यामध्ये घेते. ती उखाणा घेताना लाजत नाही.

ती म्हणते…

कमळात उभी लक्ष्मी, मोरावर आरूढ सरस्वती,…रावांचे नाव घेते, माझ्यासारखी मीच भाग्यवती

खेडय़ात दिलेली एखादी सासुरवाशीण `नाव घे’ म्हटल्यावर लफ्फेदार, दहापदरी खणखणीत उखाणा घ्यायची. सर्वांचे कान टवकारून जायचे. ती म्हणते कशी…

आजघरात माजघर । माजघरात स्वैंपाकघर । 

स्वैंपाकघरात चूल । चुलीवर तवा । तव्यावर परात । परातीत भात । भातावर तूप । तुपासारखं रूप । 

राजबिंडे रूप । रूबाबदार साजिरी । चिरेबंदीआहे वाडा।

रोज अंगणात प्राजक्ताचा सडा । कवतिक करतो सारा गाव । उठा उठा उठा राव । काम हातचं सोडा । 

गौरीच्या सणाला माहेरी मला धाडा।। 

श्रावणात सुरू होणारी गौरीगणपती सणातली ही दृश्ये आता शहरातच काय, पण ग्रामीण भागातही दुर्मिळ होत चालली आहेत. खरं तर लोकजीवन समृद्ध करणारे हे खेळ जिवंत राहिले पाहिजेत. झिम्मा, फुगडी, पिंगा आणि या खेळात म्हटली जाणारी गाणी, उखाणे हे  महाराष्ट्रातील मराठी मातीचं सौभाग्य लेणे आहे.

आजच्या संगणक युगात हे सौभाग्य लेणंच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. माणसाच्या अस्तित्वाचे सगळे अनादी अनंत लागेबांधे दरवर्षी नागपंचमी, गौरीगणपतीच्या सणाला नवेपणा देऊन जुळवत असतात. सणासुदीच्या निमित्ताने समृद्ध लोकपरंपरेतून निर्माण होणारा आपलेपणा, जिव्हाळा, कळवळा जपणं अत्यंत आवश्यक आहे. लोकपरंपरा या लोकजीवनातील महत्त्वाचं अंग आहेत. समृद्ध लोकसाहित्याचं संगोपन व संवर्धन होणं आवश्यक आहे.

[email protected]

 (लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)