गटारी नव्हे, ही तर दीप अमावस्या…जाणून घ्या महत्त्व…

>> योगेश जोशी

आपल्या कालणगणेत श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा धार्मिक आणि सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या काळात वातावरण प्रसन्न असते. त्यामुळे या काळात बरसणाऱ्या पावसाला श्रावणसरी म्हणतात. देवशयनी एकादशी झाल्यानंतर हा धार्मिक महिना येतो. हा सणाची सुरुवात म्हणजे दर्श अमावस्या. सध्या या दीप उत्सवाचा गटारी अमावस्या असा विपर्यास झाला आहे. मात्र, दीप पूजना करण्याचा हा दिवस आहे.

इंग्रजी कालगणनेतील जुलै आणि ऑगस्ट हे महिने जुलियन सीझर आणि ऑगस्टस या राजांच्या नावावरून आल्याचे अनेकांना माहिती असते. मात्र, आपल्या बारा महिन्यांची नावे आणि त्याचा इतिहास कमी जणांना माहिती असतो. आपली कालगणना चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांचा मेळ साधत बनवली जाते. ही कालगणना खगोलशास्त्र आणि ग्रहताऱ्यांच्या गतीद्वारे पंचागात केली जाते. तिथी, वार,नक्षत्र,योग आणि करण ही पंचागांची महत्त्वाची पाचे अंगे आहेत. यावरून शुभ दिवस आणि कोणत्यावेळी कोणते कार्य करावे, याचा निर्णय घेण्यात येतो.

या महिन्यात अनेक धार्मिक अनुष्ठाने व्रत, वैकल्ये केली जातात. धार्मिक दृष्टीने अंत्यत महत्त्वाच्या असलेल्या या महिन्याला श्रावण असे नाव का पडले असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याची कथा रामायणाशी निगडीत आहे. श्रीरामाचे वडील दशरथ शिकारीसाठी जंगलात गेले असता, अनवधानाने त्यांच्या हातून श्रावण या मातापिता भक्त असलेल्या मुलाची हत्या होते. आपल्या आई- वडिलांची तहान भागवण्यासाठी श्रावण बाळ नदीवर पाणी आणण्यासाठी जातो. त्यावेळी पाणवठ्याजवळ कोणी प्राणी आला असावा, असा दशरथ राजाचा समज होतो आणि ते बाण सोडतात. तो बाण वर्मी लागल्याने श्रावण बाळ जागीच कोसळतो. राजा दशरथाला आपली चूक समजते आणि तो श्रावण बाळाजवळ जातो. त्यावेळी माझ्या तहानलेल्या आई-वडिलांना पाणी द्या, अशी विनंती श्रावण बाळ करतो. दशरथ राजा श्रावणच्या मात्यापित्यांजवळ जात घडलेली घटना सांगत त्यांची माफी मागतो आणि त्यांना पाणी पिण्याची विनंती करतो. मात्र, पुत्रवियोगाने उद्विग्न झालेले श्रावणबाळाचे आईवडील राजा दशरथ याला तुझा मृत्यूही पुत्रवियोगाने होईल, असा शाप देत प्राण सोडतात. मातापिता भक्त असलेल्या श्रावण बाळामुळे या धार्मिक महिन्याला श्रावण असे नाव मिळाल्याची आख्यायिका आहे. आपल्या संस्कृतीत माता, पिता आणि गुरु यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातापित्यांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाने श्रीकृष्णाला विटेवर उभे केले. तसेच श्रीकृष्णही आपल्या लाडक्या भक्तासाठी विठ्ठलाच्या रुपात युगे अठ्ठावीस विटेवर उभा आहे, मातापिता भक्तीच्या अशा अनेक कथा आहेत. तसेच गुरुशिष्य परंपरेच्याही अनेक कथा सांगण्यात येतात. त्यामुळे या महिन्याला श्रावण नाव मिळाले आहे.

हा सण सुरू होतो, ते दीप अमावस्येने. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करण्यात येते. पुर्वीच्या काळी इलेक्ट्रिसिटी आणि बल्बचा शोध लागण्यापूर्वी दिव्यांचा वापर करण्यात येत होता. वर्षभर प्रकाश देणाऱ्या दिव्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिव्यांची आरास करत दीपपूजा करण्यात येते. तसेच अनेकजण श्रावण महिन्यात फक्त शाकाहार करत व्रतवैकल्ये करत असल्याने मासांहार वर्ज्य करतात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी अनेकजण मासांहार करतात आणि महिनाभर शाकाहार पाळतात. मात्र, सध्या या दिवशी मासांहारसोबत मद्यपानही करण्यात येते. त्यामुळे दिव्यांचा या सणाचा गटारी असा विपर्यास झाला आहे.

या महिन्यात अनेक सण, उत्सव, व्रतवैकल्ये येत असल्याने तसेच निसर्गही या काळात चांगले, प्रसन्न वातावरण निर्माण करत असल्याने आपण या धार्मिक महिन्याचा आनंद घेऊया. खऱ्या अर्थाने श्रावणमासी हर्ष मानसी…हा अनुभन आपण घेऊया. तसेच हा दिवस म्हणजे गटारी नसून दीप अमावस्या म्हणून साजरी करत त्याचे महत्त्वा जाणून घेण्याची गरज आहे.