श्री गणेश जन्माची आख्यायिका…

>> निळकंठ कुलकर्णी

कैलास पर्वतावर एकदा पार्वती देवीला स्नानासाठी जावयाचे होते, पण आसपास लक्ष ठेवण्याकरता कोणीच नव्हते. तेव्हा पार्वती देवीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि ती जिवंत केली. या मूर्तीला पहारेकरी नेमलं आणि सांगितलं की, मी स्नान करायला जात आहे. तेव्हा कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. असे सांगून पार्वतीमाता स्नानासाठी आत गेली.

काही वेळाने भगवान शंकर तिथे आले आणि ते आत जाऊ लागले. तोच त्या पहारेकऱ्याने त्यांना अडवले. त्यावर भगवान शंकर संतप्त झाले. त्यांनी त्या पहारेकऱ्याचं शिर धडावेगळं केलं. पार्वतीदेवी जेव्हा स्नान करून बाहेर आली तेव्हा त्यांनी हा प्रकार पहिला आणि त्या संतापल्या. ते धडावेगळ शिर पाहून तिने पूर्ण ब्रम्हांड हादरवून सोडलं. सर्व देव, अगदी ब्रह्मदेवापासून सगळे देव हे देवी पार्वतीची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागले. पण देवी पार्वती कोणाचं काहीही ऐकून घेत नव्हत्या.

तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या गणाला आदेश दिला की, पृथ्वीतलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचं शिर कापून घेऊन ये. गण बाहेर पडल्यावर सर्वात आधी त्याला हत्ती दिसला. तो त्याच शिर घेऊन आला. भगवान शंकरांनी ते शिर पहारेकऱ्याच्या धडाला लावले आणि त्याला जिवंत केले. हा पार्वतीचा मानसपुत्र गज (हत्ती) आनन (मुख) म्हणजेच गजानन होय. भगवान शंकराने त्याला गणांचा ईश म्हणजे देव म्हणून गणेश नाव ठेवलं. हा दिवस चतुर्थीचा होता त्यामुळे या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे.

([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या