।। श्री शंकरगाथा ।। 49 – भक्त केशवजी आशर

2942
bhakta-keshavji-ashar

>> चैतन्यस्वरूप ([email protected])

मुंबईतील निस्सीम भक्त केशवजी आशर यांच्या घरी श्रीशंकर महाराजांचे जाणे होत असे, वास्तव्यदेखील होत असे. एकदा त्यांना श्रीमहाराजांनी सासवड येथील साखर कारखान्यामध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यास सांगितले. श्रीमहाराजांच्या आज्ञेस प्रमाण मानून आशर यांनी अर्ज केला आणि त्यांचीं तेथे ताबडतोब नेमणूकही झाली. पुढे अंगभूत हुशारीमुळे केशवजी आशर जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहोचले. केशवजी आणि त्यांच्या पत्नीची श्रीमहाराजांवर दृढ श्रद्धा होती. त्यांच्या पत्नीचा उल्लेख श्रीमहाराजांच्या भक्तपरिवारामध्ये ‘बा’ या नावाने केला जातो. केशवजींचे चिरंजीव फत्तेभाई यांनादेखील बालपणापासूनच श्रीशंकर महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभला.

सोलापूर येथे राहणारे तसेच वैदिककार्य आणि भिक्षुकी करणारे अनंताचार्य उंब्रजकर हेदेखील श्रीमहाराजांचे निस्सीम भक्त. उंब्रजकर यांच्या मनात अनेकदा असा विचार येत असे की, श्रीशंकर महाराजांची कृपा केवळ सधन आणि धनिक भक्तमंडळींवरच होत असेल की आपणांसमान गरीबावरदेखील त्यांची कृपा होऊ शकेल?. याच विचारात मग्न झालेले उंब्रजकर त्या दिवशी एका यजमानाकडील अभिषेक आटोपून माघारी परतत असताना रस्त्यात त्यांची भेट श्रीशंकर महाराजांशी घडली. अवचित घडलेल्या दर्शनभेटीमुळे आनंदित झालेल्या उंब्रजकरांनी श्रीमहाराजांना नमस्कार केला त्यावर श्रीमहाराजांनी काहीएक न बोलता, ‘चल रे अंता’ असे म्हणून उंब्रजकरांचा हात धरला आणि त्यांना आपल्यासोबत रेल्वेस्टेशनवर आणले आणि तिथून आगगाडीत बसवून थेट मुंबईला केशवजी आशर यांच्या घरी नेले.

श्रीमहाराज आशरांच्या घरी पोहोचले. आगतस्वागत झाल्यावर श्रीमहाराज आशरांना म्हणाले, ‘यांना नवे कपडे तयार करून दे आणि दोन तिकिटे रिझर्व्ह कर.’ त्यावर केशवजी श्रीमहाराजांना म्हणाले, ‘कालच तिकिटे काढली.’ त्या उभयतांचे बोलणे ऐकून अनंताचार्य चकितच झाले. ‘आपण महाराजांसोबत इथे आलो, मात्र त्या आधीच आपल्या दोघांची दोन तिकिटे आशर यांनी कशी रिझर्व्ह केली?’ याचा उलगडा त्यांना झाला नाही. अनंताचार्य उंब्रजकर यांना सोबत घेऊन श्रीमहाराज पुढे मस्कत, बगदाद, फ्रांस, रोम, इटली, इंग्लंड वगैरे देशांमध्ये विमान आणि बोटींतून प्रवास करीत तीन महिने हिंडून आले आणि अखेरीस त्यांना पुन्हा सोलापुरात आणून सोडले. भारावलेल्या उंब्रजकरांना गहिवरून आले, त्यांनी साश्रूनयनांनी नमस्कार केला तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, ‘मी श्रीमंतांवर कृपा करतो, गरीबांवर करत नाही हे खरे आहे नां?’ अंतरीची खूण पटल्यामुळे पश्चात्तापाने दग्ध झालेल्या अनंताचार्यांनी श्रीमहाराजांचे चरण धरले.

एकदा श्रीमहाराज मुंबईत गेले तशी त्यांच्या दर्शनार्थ भक्तमंडळी जमा झाली. श्रीमहाराजांनी काही भक्तांना अपेयपान करण्यास सांगितले. त्यांचा आग्रह पाहून सर्व भक्त चिंतित झाले परंतु श्रीमहाराजांच्या आज्ञेपुढे कुणाचे चालते? भक्तमंडळींनी बाटल्या हाती घेतल्या आणि डोळे मिटून अपेयपान सुरू केले तेव्हा त्यांना आपण दूध पित असल्याचे लक्षात आले, तशी ते सर्वच आश्चर्यचकित झाले.

मुंबईतील स्थानिक परिसरामध्ये काही कारणांवरुन हिंदू-मुसलमान यांच्यात दंगा चालला होता. त्यावेळी श्रीमहाराज एका भक्ताकडे वास्तव्यास होते. एकदा मध्यरात्री श्रीमहाराज म्हणाले, ‘आपणांस महंमदअली रोडने जायचे आहे. गाडी काढ.’ भक्ताच्या मनात चिंता निर्माण झाली. श्रीमहाराजांनी सांगितलेला रस्ता दंगलीचा होता. भक्ताने गाडी काढली. महंमदअली रस्त्यावर काही मुसलमानांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्रीमहाराज त्यांना म्हणाले, ‘बाजूला व्हा. मला महत्त्वाचे काम आहे. परत येतेवेळी मी तुम्हांला भेटेन.’ आश्चर्य म्हणजे सर्व मुसलमान बाजूला सरकले. पुढे श्रीमहाराज थेट काळबादेवी मंदिरात गेले.

तेथे जाताच मंदिराचे दरवाजे आपोआप उघडले गेले. देवीसमोर उभे राहून श्रीमहाराजांनी शिव्यांची लाखोली वाहिली आणि ते परतले. तेव्हा आधीच्याच रस्त्याला तेच मुसलमान हातात हार घेऊन श्रीमहाराजांच्या दर्शनासाठी थांबले होते. नवल म्हणजे त्या रात्रीच दंगल आटोक्यातही आली.

आपली प्रतिक्रिया द्या