
अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरला टीम इंडियामध्ये पुनरागमनासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड होणे कठीण मानले जात आहे. सध्या श्रेयस हा बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन (रिकव्हरी) प्रक्रियेत आहे. या आठवडय़ात त्याच्या प्रकृतीचा सविस्तर आढावा घेतला जात आहे.
‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले की, वैद्यकीय पथक लवकरच आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत श्रेयस अय्यर वन डे क्रिकेटसाठी पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे संघात त्याची निवड होण्याची शक्यता कमी आहे. निवड समिती एक-दोन दिवसांत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारी रोजी बडोदा येथे खेळवला जाणार आहे.
दुखापतीनंतर 6 किलो वजन घटले
बरगडीच्या दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचे सुमारे सहा किलो वजन घटले होते. त्याने थोडे वजन पुन्हा वाढवले असले तरी मसल मास कमी झाल्यामुळे ताकद अजूनही पूर्ववत झालेली नाहीये. त्यामुळे ‘बीसीसीआय’चे वैद्यकीय पथक कोणताही धोका घेण्याच्या मनःस्थितीत नाही. याआधी, श्रेयस अय्यर 3 आणि 6 जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये सामने खेळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आता मिळालेल्या नव्या माहितीनुसार त्याला 9 जानेवारीच्या आसपासच खेळण्याची मंजुरी मिळू शकते. याचा अर्थ पुनरागमनासाठी त्याला विजय हजारे ट्रॉफीतील नॉकआऊट सामने खेळावे लागतील.




























































