कशाला उद्याची बात? प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रेयस तळपदे, अभिनेता

जवळपास तीन महिने घरी बसून आता खरंच आळसावल्यासारखं वाटतयं. लॉकडाऊनची सुरुवात झाली तेव्हा 10 ते 15 दिवसांत सगळं काही सुरळीत होईल, असं वाटलं होत. इतके दिवस लॉकडाऊन वाढेल अशी कुणीच कल्पना केली नसेल. अनपेक्षितपणे मिळालेल्या मोकळ्या वेळेत मीदेखील नवनवीन गोष्टी शिकण्याचा विचार केला होता. पण खरं सांगायचं तर सुरुवातीचे दोन महिने मी काहीच केलं नाही. दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी मला चिंतेत टाकत होती. हे संकट कधी दूर होईल? कोरोनावर औषध कधी येईल? पुन्हा सगळं सुरळीत व्हायला किती दिवस लागतील? या विचारानं मी कशावरच फोकस करू शकलो नव्हतो. अशा परिस्थितीत फक्त स्वतःला आणि घरच्यांना सांभाळणं यालाच मी प्राधान्य दिले. हे संकट आपल्यावरून इतक्यात काही जाणार नाहीये, हे सगळ्यांनाच कळून चुकलंय. त्यामुळं मीदेखील आता थोडा वेगळा विचार करू लागलोय.

सध्या मी माझ्या प्रॉडक्शन हाऊससाठी काही सिनेमांचा विचार करतोय. कुठली गोष्ट प्रेक्षकांना जास्त आवडेल या दृष्टीने काम सुरूयं. लॉकडाऊन दरम्यान घडलेली चांगली गोष्ट म्हणजे मी माझ्या दोन वर्षांच्या मुलीला खूप वेळ देऊ शकलो. दिवसेंदिवस तिला वाढताना बघणं, तिचं घरभर दुडूदुडू चालणं, तोडक मोडक बोलणं ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासारखं दुसर सुख नाही. माझ्यासाठी हा अमूल्य क्षण आहे. माझ्या बायकोला बागकाम करण्याची आवड आहे.

तिच्यामुळे आता मलाही बागकामाची आवड निर्माण झालीय. जिम बंद असल्याने फिट राहण्यासाठी घरच्या घरी व्यायाम आणि मेडीटेशन सुरुय. सद्यस्थितीत सगळ्यांनी शांत राहून  सकारात्मक विचार केला पाहिजे. आजूबाजूला घडणार्‍या चांगल्या गोष्टींपासून प्रेरणा घेतली पाहिजे. सुरक्षिततेसंबंधी नियमांचे पालन करून मालिकांचं शूटिंग पुन्हा सुरू झालंय. मध्यंतरी एका मराठी चित्रपटाच देखील शूटिंग पार पडलं. या गोष्टींमुळे मला प्रेरणा मिळतेय. मनात सकारात्मक विचार यावेत यासाठी खूप आधीपासूनच मी टीव्हीवरच्या बातम्या बघणं सोडून दिलंय. रोज तेच तेच बघत राहिलं की तुमच्या डोक्यात सकारात्मक विचार येत असतील तरी ते निघून जातील. मित्रांशी झुम कॉलवर बोलताना देखील आम्ही ठरवून एकमेकांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात बरे वाईट दिवस असतात. तसचं आपले हे वर्ष खराब आहे असं आपण समजूया. सहा महिने निघून गेलेत असेच पुढचे सहा महिनेही निघून जातील. वेळ काय कुणासाठी थांबणार नाहीये. काही ना काही तोडगा ह्यावर नक्कीच निघेल. हे वर्ष फक्त जगून घेण्याचं आहे. काम करायला संपूर्ण आयुष्य पडलंय, अस अनेक मोठी माणसं बोलून गेली आहेत. बहुतांशी हे खरंही असेल. निसर्गाच्या पुढे कुणीच नाही हे कोरोनान जगाला दाखवून दिलंय. अदृश्य आणि जिवंत नसणार्‍या या विषाणूने सगळ्या जगाला वेठीस धरलय. निसर्गाने ठरवलं तर तुम्ही जिथल्या तिथे थांबू शकता हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आपल्याला भविष्याचा विचार करण्याची फार सवय लागलीय. सगळ्यांना मी हेच सांगेन की, भविष्याची चिंता सोडा. आज जो क्षण आहे त्याचा पुरेपूर आनंद लुटा. ये जिंदगी ना मिलेगी दोबारा !!!

नियमांचे पालन करा !

लॉकडाऊन संपल म्हणजे कोरोना गेला असं अजिबात नाहीये. काही लोक बिनधास्त बाहेर पडतायत. जे होईल ते बघून घेऊ असं म्हणतायत. अशा लोकांना या अदृश्य शत्रूची तीव्रता कळलेली नाहीये. काहींना कामानिमित्त बाहेर जावं लागतय त्यांना एवढंच सांगेन की तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. सरकारने जे नियम सांगितले आहेत त्या नियमांत आपण राहिलो तर आपल्या कुणालाच त्रास होणार नाही.