
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
[email protected]
आज आपण सगळ्यात अधिक कोणत्या विषयावर बोलतो असा प्रश्न केला तर राजकारण हे उत्तर चूक म्हणता येणार नाही. राजकारण म्हणा, राजनीती म्हणा आपल्या कुतूहलाचा, चर्चेचा भाग राहिली आहे. त्याचप्रमाणे संस्कृत साहित्यातूनही राजनीतीवरील चर्चा किंवा राजकीय पेच प्रसंग रंगवणे हे नेहमीच घडत आले आहे. माघाच्या शिशुपाल वध या महाकाव्यातही या प्रकारची चर्चा येते.
शिशुपाल हा राजा म्हणून अतिशय जुलमी आहे. प्रजेला त्रास देणारा आहे. त्यामुळे त्याचा नाश भगवान श्रीकृष्ण यांनी करावा असा देवांचा निरोप घेऊन नारदमुनी कृष्णाच्या भेटीला आले आहेत. या प्रसंगापासूनच या महाकाव्याला सुरुवात होते. ‘नाटकाला जसा पूर्वरंग असतो तसे माझे बोलणे आहे. बलराम आणि उद्धव यांनी या विषयावर मार्गदर्शन करावे म्हणून मी फक्त सुतोवाच करतो आहे’, असं म्हणून कृष्ण आपले म्हणणे त्या दोघांसमोर ठेवतो. त्याच्यासमोर पेच हा आहे की देवांचा निरोप आहे त्याप्रमाणे शिशुपालावर स्वारी करून जावी. त्याचे पारिपत्य करावे की पांडवांकडे राजसूय यज्ञ आहे त्याला उपस्थित रहावे. आता वास्तविक विचार करता कृष्ण न गेल्याने पांडवांचा यज्ञ काही व्हायचा थांबणार नाही. तो होणारच. मग नीतीशास्त्राने जे सांगितले आहे त्याकडे लक्ष द्यायला हवे. त्यात सांगितले आहे की, स्वतचे कल्याण इच्छिणाऱ्या व्यक्तीने बलाढ्य होऊ पाहणाऱ्या शत्रूची उपेक्षा करू नये. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण रोग आणि शत्रू सारखेच असतात. ते खूप बळावण्यापूर्वी त्यांचा नायनाट करणे योग्य ठरते.
‘शिशुपाल माझा नातेवाईक आहे असे असूनही तो माझा द्वेष करतो याचे मला वाईट वाटत नाही. तो सर्वसाधारण जनतेला त्रास देतो याचा मात्र मला संताप येतो.’ कृष्णाने पुढे जाऊन केलेला वध हा वैयक्तिक आकसातून केलेला नाही हे इथे स्पष्ट होते. आता खरे तर कृष्णाने एवढे म्हटल्यावर शिशुपालावर चाल करून जाणे हेच उचित पाऊल म्हणता येईल. तसे ठरलेही होते, पण हा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. याला कारण कृष्ण म्हणाला, ‘हे माझे मत आहे, पण बलराम आणि उद्धव यांनी दुजोरा दिल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही.’ मग हा निर्णय का बदलला हे बघणे गरजेचे ठरते.
असे प्रसंग आणि त्यामागील विचारमंथन अफाट आहेत. माघाला विद्वान कवी का म्हणायचे हे इथे लक्षात येते. मराठीत राधेयसारख्या कादंबऱ्यांमधून अशा प्रकारे प्रसंगांची चर्चा केलेली आढळते. एकाच घटनेचे न जाणवलेले पैलू वाचकांसमोर आणणे हे अतिशय खुबीचे काम आहे. ते माघाने कसे साधले हे पाहू.
कृष्णाने रुक्मिणीचे हरण केले तेव्हापासून खरे तर शिशुपालाचा त्याच्यावर राग आहे. कृष्ण नरकासुरावर स्वारी करण्यासाठी बाहेर असताना त्याने द्वारकेला वेढासुद्धा दिला होता. अशा प्रकारे त्याचे शत्रूत्व स्पष्ट आहे. हे सगळे बलरामाच्या मुखातून वदवल्यानंतर मग माघ उद्धव नावाचे ब्रह्मास्त्र बाहेर काढतो.
उद्धवाने मांडलेले मुद्दे अतिशय वेगळे आहेत. तो पांडवांच्या राजसूय यज्ञाला जाणे हे आता किती महत्त्वाचे आहे हे पटवून देतो. त्याचे म्हणणे आहे की आत्ता आपण शिशुपालावर हल्ला केला तर त्याच्या बाजूचे राजे त्याचा पक्ष घेतील. आपले मित्र आपला, पण यातून बहुधा युद्धच सुरू होईल. मग पांडवांच्या यज्ञाचे भविष्य काय राहिले? कोणत्या घटनेचे काय पडसाद उमटतील याचा खोलवर विचार करणे किती गरजेचे आहे हे येथे सिद्ध होते. उद्धव हेही सांगतो की, या यज्ञातच आपल्याला युद्ध हवे तर त्या संघर्षाची ठिणगी पेटू शकते. पांडव कृष्णाला अग्रपूजेचा मान देणार आहेत. या गोष्टीवर शिशुपाल चिडणार आणि काही ना काही प्रतिक्रिया देणार. ती आपली संधी असू शकते… आणि पुढे झालेही तेच.
आपण इथे थोडक्यात बघत असलेली ही चर्चा तिथे उपमा उत्प्रेक्षांनी सजून येते. मगाशी आपण पाहिले तसे की, आपल्या ऐतिहासिक व पौराणिक कादंबऱ्यांनी या शैलीचे अनुकरण केलेले दिसते. त्यात या प्रसंगांचे अनेकविध पैलू आपल्याला दिसतात. पुढील लेखात अशाच एका नव्या कलाकृतीकडे वळूया.
(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि
संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)


























































