
>> विवेक दिगंबर वैद्य
चित्रकार संतकवी श्रीशुभराय महाराज यांच्या समाधीचे द्विशतकमहोत्सवी वर्ष 24 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्ताने केलेले त्यांचे पुण्यस्मरण.
सन 1750. तत्कालीन मद्रास प्रांताच्या मैसूर संस्थानातील ‘मालूर’ गावामध्ये गंगाधराचार्य आणि पन्नमा हे ऋग्वेदी ज्ञाती व जमदग्नी गोत्राचे दांपत्य सुखवस्तू कुटुंबात राहत होते. त्यांना चौंडप्पा, सुब्बाराव आणि शंकर हे तीन मुलगे होते. त्यातील सुब्बाराव हेच पुढे सर्वत्र, सर्वदूर ‘श्रीशुभराय महाराज’ या नावाने ख्यातकीर्त झाले. वेदशास्त्रसंपन्न तेलुगू घराण्यात जन्मलेले सुब्बाराव वेदशास्त्रपरायण तर होतेच, शिवाय बालपणापासून लाभलेली कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कलासक्त वृत्तीमुळे ते चित्रकला आणि गायनविद्येतही पारंगत झाले. त्यांच्यातील बुद्धिमत्ता आणि कलागुणांचा एकत्रित संगम त्यांना मैसूर संस्थानाच्या ‘नायब दिवाण’ या सर्वोच्च पदापर्यंत नेता झाला. त्या काळी मैसूर संस्थानावर वाडियार आणि टिपू सुलतान यांची सत्ता होती. मृदू व्यक्तिमत्त्व आणि कर्तव्यतत्परता यांमुळे सुब्बारावांची वर्णी मैसूर संस्थानमधील महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये झाली. टिपू सुलतानाच्या विश्वासातील अधिकारी म्हणून ते टिपूसह सर्व जनतेचा आदरही प्राप्त करते झाले.
सुब्बारावांच्या कलानिर्मितीला मैसूर संस्थानात योग्य तो वाव मिळाला. मात्र त्यावर समाधानी न राहता सुब्बारावांनी द्रविडी भाषांव्यतिरिक्त मराठी, हिंदी व संस्कृत या देवभाषा अवगत केल्या आणि त्या भाषांतून वाङ्मय निर्मितीही केली. संस्थानच्या सेवेत असताना ‘रंग-रेषेचा’ ध्यास घेणाऱया सुब्बारावांना अध्यात्माचा स्पर्श झाला नसता तरच नवल होते. श्रीहनुमंताची नित्योपासना, परब्रह्मस्वरूपाचे अखंड चिंतन आणि आत्मकल्याणाला प्राधान्य देण्याचा काळ समीप आल्याचा साक्षात्कार घडताच सुब्बारावांनी टिपू सुलतानची चाकरी सोडली आणि परमार्थाचे गूढ उकलण्यासाठी हा पुण्यात्मा मैसूर प्रांताचा त्याग करता झाला. सुब्बाराव फिरत फिरत भीमातीरावरील मैसलगी येथे आले. तेथे काही दिवस राहून ते करवीरक्षेत्री, कोल्हापूर येथे आले. प्रवासात कोरडी भिक्षा, फळं अशा सात्त्विक आहारावर गुजराण करीत ते पुढे पंढरपुरात दाखल झाले. कैवल्याच्या तेजाचे, श्रीपांडुरंगाचे दर्शन घेऊन दृष्टीचे समाधान झाले तरी मनाची तळमळ काही शांत होईना.
सुब्बारावांना वेदशास्त्र-योगाभ्यासाचे ज्ञान होते. अध्यात्माचा गाढा अभ्यास होता. पिंड सात्त्विक होता तरीही अपूर्णत्वाची सल त्यांना छळत होती. ईश्वरप्राप्तीचा निजध्यास हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. परमेशाचे अखंड चिंतन करीत सुब्बाराव पंढरपुरास येऊन पोहोचले. येथे सद्गुरु श्रीथिमप्पा रामदासी यांची भेट झाली. त्यांनी सुब्बारावांना विश्वात्मक हरी, त्रिभुवनसुंदर अशा आत्मारामाची खूण दाखविली. सुब्बारावांना आत्मसाक्षात्कार घडला. सद्गुरुभेटीने अंतरीची तळमळ निवाली. सगुणातल्या विठुरायाचे निर्गुणातले माऊलीपण अनुभवून आणि त्याची गळाभेट घेत पुढे सुब्बारावांनी लौकिक आयुष्याच्या अखेरच्या टप्प्याकडे प्रस्थान ठेवले व ते सोलापूर येथे दाखल झाले.
अंतर्बाह्य विरक्तीने व्यापलेला हा ‘पुण्यात्मा’ सोलापूर येथे गावाबाहेर ‘हत्तीबावडी’ परिसरात राहू लागला. सोलापूरकरांसाठी सुब्बाराव आता ‘शुभराय’ झाले. काव्य-कला-संगीतादी साधनांनी लाभणारी परमेशाच्या साक्षात्काराची प्रचीती शुभराय स्वतः घेत आणि अवतीभवतीच्या भक्तमंडळींनाही मिळवून देत. ‘सेवितो हा रस, वाटितो आणिका’ या सद्भावनेतून शुभरायांनी अनेकांना परमेश्वर प्रचीतीचा लाभ घडवला. यातूनच शुभरायांचा बोलबाला वाढला. पुढे गावकुसाबाहेर आत्मज्ञानात रंगलेल्या शुभरायांना तेव्हाचे किल्लेदार आबासाहेब कुंडले यांनी लोकवस्तीत आणले. सोलापूरच्या दक्षिण कसबा येथे सध्या जिथे श्रीशुभराय मठ आहे, त्याच जागेत पूर्वी शुभरायांचे वास्तव्य झाले होते.
शुभराय अंतर्बाह्य धार्मिक असले तरीही त्यांनी धर्माचा दंभ माजवला नाही. त्यांचे वैदिकत्व ज्ञानाधिष्ठत होते. जुन्या, पारंपरिक गैरलागू धार्मिक परंपरांना शुभरायांनी छेद दिल्यामुळे संतप्त झालेल्या ब्रह्मवृंदाने त्यांच्यावर बहिष्कार घातला. तेव्हा हा वाद मिटवण्यासाठी आलेले श्रीशंकराचार्य थेट शुभराय मठात उतरले. त्यांनी ब्रह्मवृंदाची चांगलीच कानउघाडणी केली. शुभरायांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच होती. त्यांच्या अभंगरचना व भजने सर्वत्र प्रसिद्ध झाली. पुढे शुभराय आषाढी-कार्तिकीच्या निमित्ताने श्रीहरीची रथयात्रा काढू लागले. या उत्सव सोहळ्यास हजारो भक्त उपस्थित राहत असत. एकदा आषाढ शुद्ध दशमीस श्रीपांडुरंगाने शुभरायांना दृष्टांत देऊन ‘माझी स्थापना कर’ असे सांगितले. दृष्टांतानुसार शुभरायांनी शेटे नामक भक्तांस पंढरपूर येथे पाठवले. तेव्हा शेटे यांना चंद्रभागेमध्ये विठ्ठलाची वालुकामय मूर्ती मिळाली. शेटे यांनी आणलेली विठुरायाची पाषाण मूर्ती शुभरायांनी आषाढी एकादशीच्या पुण्ययोगावर मठामध्ये स्थापित केली.
विठ्ठलाच्या आगमनामुळे शुभराय मठाला पंढरीचे वैभव प्राप्त झाले. आबासाहेब कुंडले, राळेरासकर, शेटे, बाबा जाईल आणि रावजीबुवा या व अशा अनेक भक्तश्रेष्ठांच्या साथसोबतीने शुभरायांनी सोलापूरचे धार्मिक वैभव इतक्या उच्चस्थानी नेले की, श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी मठास जहागीर तसेच वर्षासन देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र अयाचित वृत्ती स्वीकारलेल्या शुभरायांनी ती नम्रपणे नाकारली. शुभरायांची निर्लोभी वृत्ती पाहून पेशवे थक्क झाले. त्यांनी तरीही मठासाठी देणगी पाठवली. मात्र शुभरायांनी ती देणगी गरजू लोकांमध्ये वाटून दिली.
शुभरायांनी श्रीपांडुरंगावर अतिशय प्रेम केले. प्रेमभावनेने त्याची सेवा केली. स्वतः चित्रकार असल्यामुळे शुभराय त्यांचे देवघर रांगोळी घालून सजवत असत. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंतचे सर्व उपचार विधिवत अन् स्वतः करीत असत. नृत्य-गायनाच्या माध्यमातून ते पांडुरंगाला रिझवत असत. संतकवी शुभराय म्हणजे ‘भक्तिप्रेमाचा कल्लोळ’. शाहीर रामजोशी आणि चिमा नायकीण यांना आत्मसाक्षात्काराची प्रचीती देणाऱया शुभरायांमधील दैवी सामर्थ्यामुळे त्यांच्या हातून अनेक लीला घडल्या. मात्र ते या लौकिकानंदात कधीही रमले नाहीत.
आयुष्यात प्रत्येक घटिताला ‘प्रेम’रूपाने केंद्रस्थानी ठेवणारे, कलानंदात दंग होणारे, क्षुद्र रूढीबंधने तोडून खऱया हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे संतकवी श्रीशुभराय महाराज भाद्रपद वद्य 10 शके 1742 (सन 1820) मध्ये विठ्ठलचरणी कायमस्वरूपी लीन झाले. मात्र इहलोकीचा कायमचा निरोप घेण्याआधी त्यांनी त्यांच्या कार्याचा आणि मठाचा वारसा त्यांचे भक्त रावजीबुवा यांच्याकडे सोपविला.
रावजीबुवांनी त्याग आणि समर्पणाचा आदर्श प्रस्थापित करून श्रीशुभरायांचा वारसा पुढे चालविला. त्यांचे वंशजही हाच वारसा अतिशय समर्थपणे पुढे नेत आहेत. सर्वदूर प्रसिद्धी प्राप्त केलेले सिद्धसत्पुरुष श्रीस्वामी समर्थ आणि श्रीशंकर महाराज यांच्या अवतारकार्याचा प्रारंभ शुभराय मठातून झालेला आहे. ज्यांचा चित्र-काव्यसंग्रह महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केला त्या श्रीशुभरायांच्या वास्तव्याने पावन झालेली श्रीशुभराय मठाची वास्तू भक्तिप्रेमाचा वारंवार पुनरुच्चार करीत धर्मरक्षणासोबत सामाजिक बांधीलकी जपत दिमाखाने उभी आहे.



























































