आयुष्यात 22 जून हा दिवस येऊच नये असे आम्हाला वाटते, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. श्रीधर नाईक यांचे कार्य युवापिढीला समजावे, युवा पिढीने श्रीधर नाईक यांचे विचार आत्मासात करून समाजकार्यात पुढे यावे, यासाठी त्यांचा स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला जातो. श्रीधर नाईक रंजल्यागांजलेल्यांना मदत करत होते. त्यांची लोकप्रियता वाढत होती. त्यांचे हे यश पचत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली, असेही वैभव नाईक म्हणाले.
श्रीधर नाईक चुकीच्या गोष्टीला कडाडून विरोध करत. त्यांचे कार्य पुढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही निष्ठेने जिल्हावासियांची सेवा करत राहू, असेही ते म्हणाले. श्रीधरराव नाईक यांचा शनिवारी 33 वा स्मृतीदिन कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 68 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच जेष्ठ नागरिक व महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला.
श्रीधर नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय नेते होते. हीन प्रवृत्तीने त्यांची हत्या केली. याच हीन प्रवृत्तीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वातावरण बिघडविले आहे. मारामारी, खून हा राजकारणाचा विषय नाही, राजकारणात हे घडत असेल तर त्याला ठेचून काढले पाहिजे. केवळ वैभव नाईक, सुशांत नाईक यांचा हा लढा नाही. हा लढा आम्हा सर्वांचा आहे. सीमेवर मी दहशतवादा विरुद्ध लढत होतो. मात्र, राजकारणात आलो तेव्हा श्रीधर नाईक यांनी माझ्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली. राजकारणातही दहशतवादाविरुद्ध संघर्ष करावा लागला.आजही तो संघर्ष सुरू आहे. सर्वानी आपली तत्वे जोपसली पाहिजेत त्यासाठी लढले पाहिजे. त्याग केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केले.
जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, श्रीधर नाईक हे व्यक्ती म्हणून जिवंत नसले तरी त्यांचे विचार 33 वर्षांनंतरही जिवंत आहेत. श्रीधर नाईक याचे समाज कार्य पुढे नेण्याचे काम वैभव नाईक,सुशांत नाईक, संकेत नाईक करीत आहेत. त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्हा म्हटले की नाईक कुटुंबाकडे बघितले जाते. श्रीधर नाईक यांना अभिप्रेत असलेले काम नाईक कुटुंबीय करत आहेत, असेही ते म्हणाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, श्रीधर नाईक यांच्या स्मृति चिरंतन ठेवण्यासाठी त्यांचा वारसा जोपासण्यासाठी वैभव नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक हे मेहनत आहेत. जिल्ह्याच्या जडणघडणीत नाईक कुटूंबांचे मोठे योगदान आहे. राजकारणातील अडथळा दूर करण्यासाठी श्रीधर नाईक यांची हत्या करण्यात आली. सध्या राजकारणात सत्तेसाठी पैसे आणि पैशासाठी सत्ता हेच समीकरण चालू आहे. न्याय, मते आणि नेते देखील पैशाने विकत घेतले जात आहेत. जनतेने अशा प्रवृत्ती विरोधात लढले पाहिजे. एक दिवस नक्कीच श्रीधर नाईक यांच्या विचारांचा विजय होईल.
सुशांत नाईक म्हणाले 33 वर्षे वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत. सामाजिक कार्य करत असताना 10 हजार रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. चित्रकला, निबंध, मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या. महिला बचत गट, जेष्ठ नागरिक यांचा सत्कार करण्यात येतो. दरवर्षी रक्तदान शिबीर घेण्यात येते यापुढेही अशाच सामाजिक कार्याचा वारसा जोपासला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत -पालव, संदीप सरवणकर यांनीही आपले विचार व्यक्त करून श्रीधर नाईक यांच्या स्मृतींना उजाळा दिला. सूत्रसंचालन बाळू मेस्त्री, आभार प्रदर्शन संकेत नाईक यांनी केले.