राष्ट्रकुल स्पर्धेनंतर श्रीलंका, पाकिस्तानचे काही खेळाडू झाले बेपत्ता

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात नुकतीच 22 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा मोठय़ा उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम मोडले गेले. अनेक स्टार खेळाडूंनी निराशा केली, तर क्रीडा जगताला काही नवे स्टार खेळाडूही मिळाले. मात्र स्पर्धेदरम्यान काही अप्रिय घटनाही घडल्याचे समोर आले आहे. त्यातील एक घटना म्हणजे श्रीलंका देशाचे 10 खेळाडू आणि पाकिस्तानी संघातील दोन बॉक्सर स्पर्धेदरम्यान बेपत्ता झाले. आपल्या देशातील असुरक्षित वातावरण, देशातील गरिबी, क्रीडा संस्कृतीचा अभाव आणि पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण अशा विविध कारणामुळे हे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्यानंतरही मायदेशी परतण्यात रस दाखवत नाहीत. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान खेळाडू बेपत्ता होण्याच्या घटना क्रीडाविश्वाला तशा नवीन नाहीत, मात्र बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतही खेळाडू बेपत्ता होण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

मायदेशी रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानी बॉक्सर बेपत्ता

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सांगता झाल्यानंतर बर्मिंगहॅममधून पाकिस्तानचे  सुलेमान बलोच आणि नझिरुल्ला हे दोन बॉक्सर बेपत्ता झाले. पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव नासेर तांग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी काही तास आधी हे बॉक्सर बेपत्ता झाले. या दोन्ही बॉक्सरचे पासपोर्टसह प्रवासाची कागदपत्रे महासंघाच्या अधिकाऱयांकडे आहेत. पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनने हरवलेल्या बॉक्सरच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पाकिस्तानचा राष्ट्रीय जलतरणपटू फैजान अकबर हंगेरीतील फिना वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बेपत्ता झाल्याच्या दोन महिन्यांनंतर बॉक्सर हरवल्याची घटना घडली आहे.

श्रीलंकेसाठी या घटना नवीन नाहीत

श्रीलंका देश म्हणजे खेळाडूंची खाण आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून आपले खेळाडू बेपत्ता होणे हा प्रसंग श्रीलंकेसाठी काही नवीन नाहीये. यावेळी नऊ खेळाडू व एक मॅनेजर असे श्रीलंकन चमूतील दहा जण राष्ट्रकुल स्पर्धेनंतर बेपत्ता झाले. 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही दोन श्रीलंकन खेळाडू बेपत्ता झाले होते. शिवाय ओस्लो जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेदरम्यानही श्रीलंका संघाचा मॅनेजर असाच गायब झाला होता. यांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही.

काही स्थायिक होतात, काही मायदेशी परततात

देशातील गरिबीमुळे पिंवा राजकीय संकटामुळे वैतागलेले काही खेळाडू नवीन देशात कायमस्वरूपी स्थायिक होतात. नोकरी करून पैसे घरी परत पाठवतात, मात्र काही खेळाडूंना परदेशातील वातावरण आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही. त्यामुळे ते थोडय़ा दिवसांनी ते पुन्हा मायदेशात परततात.

…म्हणून खेळाडू होतात बेपत्ता

इंग्लंड, अमेरिकेसारखे देश आपल्या देशात होणाऱया आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडू आणि अधिकाऱयांना स्पर्धा संपल्यानंतर काही महिन्यांसाठी व्हिसा देतात, पण अनेकदा खेळाडूंचे पासपोर्ट आणि महत्त्वाची कागदपत्रे त्यांचे प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांकडे असतात. असे असूनही काही खेळाडू चांगल्या राहणीमानाच्या संधीसाठी यजमान देशातच राहणे पसंत करतात.