श्रीरामपूर – रिकाम्या रेमडेसिवीर इंजेक्शन बाटलीमध्ये सलाईनचे पाणी भरून विकणाऱ्याला अटक

डॉक्टरांनी वापरून कचऱ्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडेसिवीर इंजेक्शन बाटलीमध्ये सलाईनमधील पाणी भरुन विकणाऱ्याला पोलिसांनी पकडले. रईस अब्दुल शेख (20, रा. मातापुर ता.श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. शेख हा एक्स रे टेक्नीशियन म्हणून एका दवाखान्यात काम करतो.

पोलिसांनी यापूर्वी रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या दिनेश बनसोडे (रा. श्रीरामपूर, श्री कोविड सेंटर मेडिकल दुकान कर्मचारी) शुभम श्रीराम जाधव (कोल्हार, ता. राहाता) प्रविण प्रदीप खुने (भातंबरी, बार्शी) या तिघांना पकडले आहे. हा काळाबाजार प्रकरणात एका डॉक्टरचा सहभाग आहे. हे प्रकरण ताजे असतानाच पोलिसांनी आणखी एकास पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोरोना रुग्णांचे नातेवाईक रेमडेसिवीरचे इंजेक्शन मिळवण्यासाठी वणवण भटकत आहे. त्याचा फायदा घेत श्रीरामपुरातील एका रुग्णाला रेमडेसिवीरची आवश्यकता असल्याचे शेख याला समजले. रुग्णाच्या नातेवाईकाला रईस अब्दुल शेख याने संपर्क करून रेमडेसिवीर औषध देतो, त्यासाठी पंचवीस हजार रुपये लागतील, असे सांगितले. परंतु पेशंटच्या नातेवाईकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना ही माहिती सांगितली. पोलिसांनी सापळा रचून रईस शेख याला ओव्हर ब्रीज जवळ पकडले. त्याच्याकडून बनावट रेमडेसीवीर इंजेक्शन पोलिसांनी जप्त केले.

डॉक्टरांनी वापरुन कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलेल्या रिकाम्या रेमडेसिवीर बाटलीमध्ये सलाईनचे पाणी भरून विकायचा. हा त्याचा पहिला प्रयोग होता, असे पोलिसांना सांगितले. श्रीरामपूर शहर पोलिसांनी शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या