मेथीपासून मेंदूपर्यंत… अवकाशात केले अनोखे प्रयोग, गगनयानसाठी ’गेमचेंजर’ ठरणार शुभांशु यांची अंतराळवारी

नासाच्या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेले हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज सुखरूप पृथ्वीवर परतले. शुभांशु यांनी अंतराळ स्थानकात मेथीपासून ते मेंदूपर्यंत वेगवेगळे प्रयोग केले. त्यातून अनेक निष्कर्ष हाती आले. त्यामुळे त्यांची ही वारी हिंदुस्थानच्या ’गगनयान’ मिशनसाठी व विविध क्षेत्रांतील वाटचालीसाठी गेमचेंजर ठरणार आहे.

शुभांशु शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंतराळ स्थानकात 60 हून अधिक प्रयोग केले. औषध, शेती आणि अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगांचा त्यात समावेश होता. शुभांशु यांनी केलेल्या 60 प्रयोगांपैकी 7 प्रयोग हिंदुस्थानने सुचवले होते. हे प्रयोग हिंदुस्थानच्या गगनयान मोहिमेसाठी मोलाचे ठरू शकतात. यात अवकाशातील प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणे, स्नायूंवर होणारे परिणाम, बियाणांची लागवड, ऑक्सिजन उत्पादन, इंधन आणि अन्न व्यवस्था आणि स्क्रीन टाइम अशा प्रयोगांचा समावेश होता. याशिवाय, त्यांनी एक अतिशय अनोखा प्रयोग केला. संगणक आणि मेंदू यांच्यातील संबंधांवरही त्यांनी प्रयोग केले. इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे.

  • खाण्यासाठी उपयुक्त असलेले सूक्ष्म शेवाळ अंतराळात कसे वाढवता येईल? अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा त्या शेवाळावर काय परिणाम होऊ शकतो.
  • शुभांशु यांनी मेथी आणि मूगाचे बियाणे अंकुरित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग भविष्यात अंतराळवीरांना शारीरिक पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हे बियाणे कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाड आणि आयआयटी धारवाड यांनी विकसित केले आहेत.
  • शुभांशु शुक्ला यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात संगणक स्क्रीन आणि मानवांच्या परस्परसंवादाचे विश्लेषण केले. हा प्रयोग गगनयान मोहिमेसाठी वरदान ठरू शकतो. अंतराळवीरांना मोहिमेसाठी तयार करताना याची मदत होईल.
  • शुभांशु शुक्ला यांनी संगणकाचा थेट मेंदूशी संपर्क साधणे शक्य आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. मानवाने असा प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • शुभांशु यांनी सायनोबॅक्टेरियावर प्रयोग केले. अवकाशात कार्बन आणि नायट्रोजनचा पुनर्वापर करून ऑक्सिजन तयार करण्यासाठी हा प्रयोग खूप महत्वाचा आहे. हे तंत्रज्ञान भविष्यात प्रभावी ठरल्यास अवकाशात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.
  • मानवी शरीरातील स्नायूंवर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा काय परिणाम होतो. हाडे कमकुवत व ठिसूळ होण्यापासून कशी वाचवता येतील हे शोधण्याचा प्रयत्न.
  • शून्य गुरुत्वाकर्षणात भौतिकशास्त्राची नियम कसे बदलतात हे शोधण्यासाठी पाण्याच्या बुडबुड्यांवर प्रयोग.