
चौथ्या कसोटीत कर्णधार शुभमन गिलला अंतिम संघात शार्दुल ठाकूर नव्हे तर कुलदीप यादव हवा होता, असा गौप्यस्फोट केलाय हिंदुस्थानचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ समालोचक सुनील गावसकर यांनी. मात्र गिलच्या इच्छेविरुद्ध अंतिम निर्णय झाल्याची शक्यता असल्याचीही शक्यता वर्तवत संघात काहीतरी गडबड असल्याचेही संकेत दिले.
ते म्हणाले, कर्णधाराला आपल्या संघात कोणाला खेळवायचे आणि कोणाला नाही, हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार असावा. शेवटी हा त्याचा संघ असतो. प्रशिक्षक किंवा इतर कोणीही त्याच्या निर्णयावर प्रभाव टाकू नये. गावसकर यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुस्थानी संघात गिलपेक्षा प्रशिक्षक गंभीर यांचीच चालत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
गावसकरांच्या म्हणण्यानुसार त्याला या कसोटीत संधी मिळायला हवी होती. कर्णधार शुभमन गिलवर निर्णयाची जबाबदारी असते, त्यामुळे निवड त्याचीच असायला हवी होती, पण प्रत्यक्षात संघात वेगळेच घडत आहे. हे संघासाठी फार घातक ठरतेय. याचे उदाहरण मँचेस्टरला दिसलेय. त्यामुळे पाचव्या कसोटीत कुलदीप यादवला संधी मिळण्यासाठी सर्वांचाच आग्रह असेल.
तळापर्यंत फलंदाजी मजबूत करण्याकडे गंभीर यांचा कल
संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर फलंदाजीत योगदान देणाऱया गोलंदाजांना अधिक पसंती देत आहेत. विशेषतः हेडिंग्ले कसोटीत 3 विकेट्सवर 430 अशी मजबूत स्थिती असूनही हिंदुस्थान 471 धावांवर सर्वबाद झाला होता. त्यामुळे फॉर्मच्या जोरावर असलेला पूर्णवेळ फिरकी गोलंदाज संघाबाहेर राहणं अनेकांना खटकतंय.
कुलदीपला वगळल्याने अनेक प्रश्न
कुलदीप यादवला संधी न दिल्याने गिल आणि गंभीरवर टीका झाली असून ज्यो रूटच्या ऐतिहासिक शतकाच्या पार्श्वभूमीवर हे अधिक चर्चेत आले आहे. 2018 मध्ये कुलदीपने मँचेस्टर आणि लॉर्ड्समध्ये रूटला दोनदा त्रासदायक ठरवत बाद केले होते. त्यामुळे त्याच्या वगळण्याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.





























































