‘टीम इंडिया’च्या मालिका विजयाचा दस का दम! वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहावी कसोटी मालिका जिंकली

‘टीम इंडिया’ने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका 2-0 फरकाने जिंकत निर्भेळ यश संपादन केले. मंगळवारी अखेरच्या दिवशी केवळ तासाभराच्या खेळात दोन गडी गमावत हिंदुस्थानने 121 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि मालिका विजय साजरा केला. हिंदुस्थानने विंडीजवर सलग दहा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करून आपला ‘दस का दम’ दाखविला. या मालिका विजयामुळे हिंदुस्थानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुण 61.9 टक्क्यांवर पोहोचले असून गुणतक्त्यात ‘टीम इंडिया’ तिसर्या स्थानावर कायम आहे.

के. एल. राहुलने दुसऱया डावात जबाबदारीची खेळी करत नाबाद 58 धावा केल्या. या मालिकेत त्याने एकूण 192 धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 219 धावा केल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने 12 बळी घेत मालिकेतील सर्वाधिक बळी टिपले. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानचा हा पहिला मालिका विजय ठरला. कारण त्याच्या नेतृत्वाखाली याआधीची इंग्लंडविरुद्धची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली होती.

आज अखेरच्या दिवशी हिंदुस्थानला विजयासाठी आणखी 58 धावांची गरज होती. हिंदुस्थानने पहिल्या डावात केवळ साडेचार सत्रांत डाव घोषित केला होता आणि त्यानंतर विंडीजवर फॉलोऑन लादला होता. सलग 200 षटके गोलंदाजी करणाऱया हिंदुस्थानला विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य मिळाले होते.

हिंदुस्थानने 1 बाद 61 धावसंख्येवरून आज पुढे खेळायला सुरुवात केली. सकाळच्या सत्रात साई सुदर्शन (39) आणि कर्णधार शुभमन गिल (13) बाद झाले. तिसऱया क्रमांकावरील आपले स्थान अजून स्थिर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सुदर्शनने पहिल्या डावात 87 धावा केल्या होत्या, मात्र दुसऱया डावात त्यांनी शाय होपने घेतलेल्या अप्रतिम झेलवर बाद होऊन निराशा दिली. गिलने आक्रमक खेळ करताना रॉस्टन चेसच्या एका षटकात एक षटकार आणि चौकार ठोकला, पण नंतर हवेत चेंडू उंच मारून तो ग्रॅव्हीसकरवी झेलबाद झाला. राहुलने मात्र संयमी खेळ करत विजयाचे काम पूर्ण केले. त्याने दोन षटकार लगावले. त्याने 108 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांसह आपली नाबाद 58 धावांची खेळी सजविली.

‘टीम इंडिया’चा हा वेस्ट इंडीजविरुद्ध केवळ सलग दहावा कसोटी विजयच ठरला नाही, तर यजमानांनी आपला 122 वा कसोटी विजय मिळवला आणि दक्षिण आप्रैकेला मागे टाकत सर्वाधिक कसोटी विजयांच्या यादीत तिसरे स्थानही मिळवले.

दिल्ली कसोटीत विक्रमवृष्टी

n हिंदुस्थानने वेस्ट इंडीजविरुद्ध सलग 10 कसोटी सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाची बरोबरी केली. कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सलग सर्वाधिक कसोटी विजयांचा हा विक्रम आहे.

n शुभमन गिलने कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडविरुद्ध 2-2 अशी मालिका ड्रॉ झाल्यानंतर ही त्याची पहिली संपूर्ण मालिका जिंकण्याची कामगिरी आहे.

n मोहम्मद सिराजने दिल्ली कसोटीत 3 बळी टिपत 2025 मध्ये एकूण 37 विकेट्ससह सर्वाधिक कसोटी बळी मिळवणारा हिंदुस्थानी गोलंदाज बनला.

n वेस्ट इंडीजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेल 19 वर्षांनंतर हिंदुस्थानविरुद्ध शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला.

n वेस्ट इंडीजचा 11 व्या क्रमांकाचा फलंदाज जेडन सील्सने दुसऱया डावात 32 धावा करीत अखेरच्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

n यशस्वी जैस्वाल हा 24 वर्षांच्या वयात सात कसोटी शतके झळकावत दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथनंतरचा दुसरा सलामीवीर ठरला.

n शुभमन गिलने 2025 मध्ये कर्णधार म्हणून पाचवी कसोटी जिंकली. हे कोणत्याही हिंदुस्थानी कर्णधाराचे त्या वर्षातील सर्वोच्च यश आहे.

n कुलदीप यादवने दुसऱया डावात 5 बळी घेत जॉन बर्न्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. वर्षभरात एका डावात सर्वाधिक 5 बळी टिपणारा तो संयुक्त पहिल्या स्थानावर आहे.

n जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये 50 पेक्षा जास्त बळी मिळवले. अशी कामगिरी करणारा तो सातवा हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज ठरला.