मुद्दा : मंत्रशक्तीचा उपयोग

28

>>श्यामसुंदर बापट<<

महर्षी विनोद यांनी सुरू केलेल्या व्यासपूजा महोत्सवास या वर्षी ७५ वर्षे होत आहेत. गुरुपौर्णिमेला व्यासपूजा महोत्सव केला जातो. त्यानिमित्त हा लेख

महर्षी विनोद हे मंत्र आणि तंत्र या अतिंद्रिय विद्येतील सखोल अभ्यासक होते. आपल्या या शक्तीचा वापर करून ते गरजू आणि पीडित लोकांची दुःखं कमी करायचे. त्या सर्वांशी ते अत्यंत प्रेमाने संवाद साधायचे. अतिंद्रिय विद्येबाबतचा त्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे शास्त्रीय होता. आपल्या अंगी असलेल्या शक्तींची प्रयोगशाळेत काटेकोरपणे तपासणी व्हावी असं त्यांना मनापासून वाटायचं. १९५१ ते १९५४ मध्ये अमेरिकेतील डॉ. ऑण्ड्रिया पुहारीश व डॉ. फायफर या दोन महान शास्त्रज्ञांनी त्यांच्यावर असे प्रयोग केले.

Uri : A Journal of the Mystery of Uri Geller’  या आपल्या पुस्तकामध्ये डॉ. ऑण्ड्रिया पुहारीश यांनी न्यायरत्न विनोद यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीचे सुरेख वर्णन केले आहे.

‘‘माझ्या परवानगीने डॉ. विनोदांनी आपल्या उजव्या हाताचा अंगठा व तर्जनीने माझ्या उजव्या हाताची अनामिका मध्यभागी अलगद पकडली. साधारणपणे एक मिनिटभर नाडी परीक्षेसारखी त्यांनी माझी परीक्षा केली. त्यावेळी तोंडाने हळुवार शीळ घातली. जणू काही ते माझ्या व्यक्तित्वाबरोबर स्वतःचे टय़ुनिंग करीत होते. त्यानंतर त्यांनी माझा हात सोडला आणि पुढचा एक तासभर माझी जीवनकहाणी एखाद्या पुस्तकामधून वाचल्यासारखी नेमकेपणाने मला ऐकवली. माझा भूतकाळ तर इतका तंतोतंत बरोबर सांगितला की, मी आश्चर्याने थक्क झालो.’’ डॉ. पुहारीश यांना नेहमी विनोद यांच्या स्पंदशास्त्रातील अधिकाराचे झालेले हे सहज दर्शन होते. ‘हिमालय दर्शन’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत महर्षी विनोद स्वतः म्हणतात-

‘अनेकानेक पूर्वजन्मातील कर्माशयाबरोबर आलेली ‘स्पंद विशिष्टता’ प्रत्येक व्यक्तिमात्राच्या ठिकाणी सदैव सिद्ध असते. करंगळीजवळील बोटाच्या अनामिकेच्या खाली असलेल्या सूर्य-शैलीवर ही ‘स्पंद-विशिष्टता’ सदैव ध्वनित होत असते. हे स्पंद ओळखण्याची एक पद्धती आहे, प्रक्रिया आहे, सिद्धी आहे. विशिष्ट स्पंद-संख्या व विशिष्ट स्पंद-गुण यांच्या सहाय्याने अतीत जन्म, विद्यमान जन्म व अनागत जन्म या जन्मत्रयींबद्दलची वस्तुस्थिती व परिस्थिती अचूकपणे सांगता येते. प्रत्येक व्यक्तीच्या अनामिकेखालील सूर्यशैलावर त्या व्यक्तीचे स्पंदवलय निनादित होत असते. तोच त्याचा बीजमंत्र किंवा आत्ममंत्र होय.’’

मंत्रशक्तीकडे विशुद्ध, शास्त्रीय, वैज्ञानिक दृष्टीने पाहिले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. जिज्ञासेने, शोधक बुद्धीने, आस्थेने या विषयाचा कसून अभ्यास झाला पाहिजे असे त्यांना वाटे. मंत्रविद्या केवळ आमची आहे म्हणून किंवा मंत्रविद्या म्हणूनही श्रेष्ठ नव्हे किंवा उपेक्षणीयही नव्हे. त्याचप्रमाणे आधुनिक विज्ञान पाश्चात्त्यांचे म्हणून ग्राहय़ नव्हे आणि त्याज्यही नव्हे. जिला कुठलाही पूर्वग्रह दूषित करत नाही आणि अतिंद्रिय, अलौकिक अनुभव येत नाहीत, कळत नाहीत म्हणून ते असंभाव्य ठरत नाहीत, अशी त्यांची तर्कशुद्ध भूमिका होती. अंधश्रद्धेबाबत त्यांचे विचार आजही तितकेच मौलिक आहेत. अंधश्रद्धा धार्मिक विषयातच असते असं नाही. विज्ञानाविषयीदेखील अंधश्रद्धा असू शकते आणि धार्मिक बाबतीत डोळस चिकित्सा असंभाव्य नसते असेही ते आग्रहाने  सांगत असत. महर्षी विनोद यांची तळमळ ही होती की, मानवाने विकास क्रमातील, उक्रांतीतील पुढचे पाऊल जितके जलद टाकता येईल तितके टाकले पाहिजे व त्यासाठी या सर्व अतिंद्रिय विद्यांचा फार चांगला उपयोग होऊ शकतो असा त्यांचा विश्वास होता.

आपली प्रतिक्रिया द्या