
‘हर फिक्र को धुए में उडाता चला गया…’ म्हणत मोठय़ा जल्लोषात बुधवारी रात्री सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. ऐन निवडणुकीच्या मोसमात आलेला हा थर्टी फर्स्ट तळीरामांनी गाजवला. शेवटचा दिवस आणि रात्रही गोड करण्यासाठी मदिरालयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या, तर गुरुवारी सकाळी नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी मंदिरांमध्ये एकच झुंबड उडाली.
‘शेवट गोड ते सगळंच गोड’ ही म्हण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तळीरामांमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. त्यामुळे थर्टी फर्स्टच्या रात्री मुंबई फक्त जागीच राहिली असं नव्हे तर दणदणत राहिली. गल्लोगल्ली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बार आणि हॉटेले तुडुंब भरली होती. ठिकठिकाणी ग्लासांचा किनकिनाट सुरू होता. ज्यांनी बैठकांसाठी खास जागा बघून ठेवल्या होत्या त्यांनी पार्सल आणण्यासाठी वाईन शॉपच्या बाहेर तुफान गर्दी केली. सायंकाळनंतर क्षणाक्षणाला ही गर्दी वाढत गेली. या गर्दीतून मार्ग काढत मद्यपींनी ‘चीअर्स’ केले. ‘पी कर दो घूँट देख जाहिद… क्या तुझ से कहूँ शराब क्या है…’ असे म्हणत एकमेकांना एक पेग आणखी घेण्यासाठी आग्रह केला गेला. अवघे वातावरण झिंगाट झाल्याचे चित्र होते.
बुधवारी रात्रीचे हे चित्र गुरुवारी सकाळी अचानक पालटलेले दिसले. नव्या वर्षाची सुरुवात शुभ आणि मंगलमय वातावरणात व्हावी यासाठी भल्यापहाटे मंदिरांमध्ये रांगा लागल्या.
n राज्यात शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, शेगाव, मांढरदेवी या ठिकाणी तर मुंबईत सिद्धिविनायक, महालक्ष्मी, वडाळा विठ्ठल मंदिरात देवदर्शनासाठी झुंबड उडाली. ‘नवे वर्ष सुखाचे जाऊ दे…’ असे साकडे देवाला घालण्यात आले. मंदिरांमधील गर्दीचा हा ओघ सायंकाळपर्यंत कायम होता.

























































