सिद्धार्थ शुक्ला ठरला ‘बिग बॉस’, 13व्या पर्वाच्या विजेतेपदावर कोरलं नाव

1560

बिग बॉसच्या सर्वात लांबलेल्या 13व्या पर्वाचा विजेता अखेर जाहीर झाला आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस 13’चं जेतेपद पटकावलं आहे. अफेअर्सपासून ते आक्रमकेतपर्यंत अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलेल्या सिद्धार्थने या पर्वात प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. त्या जोरावरच त्याने ‘बिग बॉस’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. बिग बॉसच्या ट्रॉफीसह सिद्धार्थला 40 लाख रुपयांचं रोख बक्षिसही मिळणार आहे.

तेराव्या पर्वाच्या अंतिम सोहळा सुरू झाल्यानंतर सर्वात आधी पारस छाब्रा बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. सलमान खानने त्याला दहा लाखांची ऑफर घेत पारस बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. त्यानंतर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांच्यात अंतिम लढत झाली. शहनाझ गिल, रश्मी देसाई आणि आरती सिंह यांनीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. अखेर सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज यांच्यामध्ये बिग बॉसच्या जेतेपदाची लढत झाली.

अंतिम निकालासाठी 15 मिनिटांसाठी लाइव्ह व्होटिंग लाइन ओपन करण्यात आली. यामध्ये प्रेक्षकांनी सिद्धार्थच्या पारड्यात भरभरून मते टाकली. प्रेक्षकांच्या मतांच्या जोरावर सिद्धार्थनं जेतेपदावर मोहोर उमटवली. ‘बिग बॉस’च्या या महाअंतिम सोहळ्याला सलमानने आपल्या खुमासदार शैलीचा तडका देत सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली होती.

आपली प्रतिक्रिया द्या