
सोलापूरे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या महायात्रेला 68 लिंगांना तैलाभिषेक करत प्रारंभ झाला आहे. मानकरी व नंदीध्वजधारकांच्या उपस्थितीत तैलाभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात व उत्साहात झाला. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेवर निर्बंध असले तरी धार्मिक विधी व भक्तगणांत उत्साह पूर्वीसारखाच होता.
उत्तर कसब्यातील कपिलसिद्ध गुरू मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाडय़ात सकाळी मानाच्या पहिल्या व दुसऱया नंदीध्वजाचे व अमृत लिंगाचे पूजन करण्यात आले. यावेळी काशिपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, पुजारी राजशेखर हिरेहब्बू व पुजारी मंडळी उपस्थित होते. सजविलेल्या बग्गीतून श्री सिद्धेरामेश्वर महाराजांची पालखी व योगदंड घेऊन पुजारी मंडळी सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या भक्तांनी दुरूनच योगदंड व पालखीचे दर्शन घेतले. विजापूर वेस येथे मुस्लिम बांधवांनी योगदंड व पालखीवर पुष्पावृष्टी करीत स्वागत केले. यंदाच्या वर्षी नंदीध्वजधारक व मानकरी अशा 50 जणांना प्रवेशपास देण्यात आल्याने गर्दी नव्हती.
सिद्धेश्वर मंदिरातील अमृतलिंगाजवळ विडा देण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य मंदिरामध्ये धार्मिक विधी व आरती करण्यात आली. यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात लहान नंदीध्वज ठेवण्यात आले होते. यानंतर मानकरी व नंदीध्वजधारकांनी 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी प्रयाण केले. शहरातील श्री सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगांना आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. बाराबंदी घातलेल्या भक्तगणांनी ‘एकदा भक्तलिंग हर्र… बोला हर्र… ‘श्री सिद्धेश्वर महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सकाळी आमदार विजयकुमार देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या आमदार विद्या चव्हाण यांनी नंदीध्वजाचे दर्शन घेतले.
कोरोना व ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हिरेहब्बू वाडा परिसरात ते पालखी नेण्याचे मार्ग व सिद्धेश्वर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने पोलीस छावणीचे दृश्य दिसत होते. सलग दुसऱया वर्षी मानकरी व मोजक्या नंदीध्वजधारकांच्या उपस्थितीत हा तैलाभिषेक सोहळा झाला.
आज अक्षता सोहळा
यात्रेतील महत्त्वाचा अक्षता सोहळा गुरुवारी सकाळी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टय़ाजवळ योगदंड व सात नंदीध्वजाच्या साक्षीने संपन्न होणार आहे. संमती कट्टा आकर्षक फुलांनी सजविण्यात आला आहे. संपूर्ण परिसर बॅरिकेड्सने बंद करण्यात आले आहे. कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



























































