कर्जाचा हप्ता कमी होण्याचे संकेत; आरबीआय सकारात्मक

आगामी पतधोरणात व्याजदर कपातील वाव असल्याचे सूतोवाच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले. रेपो दरात कपात झाल्याने कर्जदाराला दिलासा मिळू शकतो. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज सुरू आहे, त्यांच्यासाठी ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे.

एमपीसी बैठकीपूर्वी मोठा संकेत

पुढील महिन्यात 3 ते 5 डिसेंबरदरम्यान आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीआधीच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, दरांमध्ये कपात करायची की नाही, याचा अंतिम निर्णय एमपीसीच्या बैठकीत घेतला जाईल. ऑक्टोबरच्या बैठकीतच दरांमध्ये कपातीचे संकेत देण्यात आले होते, त्यामुळे आगामी बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी ते जूनदरम्यान एमपीसीने सुमारे 100 बेसिस पॉइंटने दर कमी केले होते. मात्र, ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये रेपो दर 5.5 टक्के वर स्थिर ठेवला गेला होता.

दरात कपात होण्याची मोठी शक्यता निर्माण होण्यामागे मुख्य कारण म्हणजे, ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित महागाई घटून 0.25 टक्के या विक्रमी पातळीवर आली आहे, जी सप्टेंबरमध्ये 1.44 टक्के होती

तज्ञांच्या मते, डिसेंबरच्या बैठकीत 25 बेसिस पॉइंटपर्यंत (0.25) दरात कपात होण्याची शक्यता आहे.