
सोन्याचांदीची खरेदी करण्याची कितीही इच्छा असली तरी आता ते आवाक्यात राहिलेले नाही. महिनाभरात चांदीने तब्बल लाखाचा पल्ला ओलांडून प्रतिकिलो तीन लाखांची मजल गाठली आहे. तर तोळाभर सोनेही दीड लाखावर गेले आहे. सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहने तसेच 5जी टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या प्रमाणावर चांदीचा वापर होत असल्यामुळे ही वाढ अस्मानाला भिडली असल्याचे उद्योग जगताकडून सांगण्यात आले.
15 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा भाव प्रतिकिलो 2 लाख रुपये एवढा होता. महिनाभरातच चांदीने दराचा उच्चांक गाठला आहे. सोमवारी सराफा बाजारात चांदीचा भाव 3 लाख रुपये प्रतिकिलो एवढा नोंदवला गेला. एक लाख प्रतिकिलोवरून दोन लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी नऊ महिने, तर 50 हजारांवरून 1 लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी चांदीला तब्बल 14 वर्षांचा प्रवास करावा लागला.
चांदीचा दर वाढण्याचे कारण…
चांदीचा दागिन्यांसाठी होणारा वापर सर्वश्रुत आहे. परंतु आता सोलार पॅनल, इलेक्ट्रिक वाहने, 5 जी टेक्नॉलॉजीसाठीही चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. संपूर्ण जगात हरित ऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येत असल्यामुळे चांदीच्या वापरात कैकपटीने वाढ झाली आहे. चांदीच्या मागणीत प्रचंड वाढ असली तरी त्या तुलनेत उत्पादन मात्र किरकोळ आहे. अनेक देशांमध्ये पर्यावरणाच्या कडक नियमांमुळे खाणउद्योगावरही परिणाम झाला आहे. याशिवाय जवळपास 70 टक्के चांदी तांबे आणि जस्तासारख्या धातूच्या खाणीतून मिळते. जोपर्यंत तांब्याचे खाणकाम वाढणार नाही, तोपर्यंत चांदीचेही उत्पादन वाढणार नाही. त्याचबरोबर जगभरात वाढलेले भौगोलिक राजकीय तणाव आणि महागाईमुळेही गुंतवणूकदार शेअरबाजाराऐवजी सोन्याचांदीत रस दाखवू लागले आहेत.
वर्षभरात सोने 75 टक्क्यांनी वाढले
गेल्या वर्षभरापासून सोन्याचा भाव गगनाला भिडत आहे. वर्षभरात सोने तब्बल 57,033 रुपयांनी वाढले आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी शुद्ध प्रतीचे 10 ग्रॅम सोने 76,162 रुपये होते.
31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचा भाव 1,33,195 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. ही वाढ 75 टक्के एवढी प्रचंड आहे. गुरुवारी सोने प्रतितोळा 1,43,978 रुपयांवर पोहोचले.





























































