चांदी खरेदी करा, आयुष्याचं ‘सोनं’ होईल; Robert Kiyosaki यांची भविष्यवाणी खरी ठरणार?

जागतिक अस्थिर परिस्थिती आणि आर्थिक घडामोडींमुळे शेअर बाजार आणि सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम होत आहे. एप्रिल महिन्यात सोन्याच्या किमती सर्वकालीन उच्चांकावर होत्या. त्यानंतर आता त्यात घसरण झाली आहे. तर चांदी अजूनही तेजीत असून दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. सोमवारी चांदीच्या दराने त्याचे सर्व जुने विक्रम मोडले आणि एक नवीन शिखर गाठले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर चांदीने प्रति किलो 1,07,171 रुपये पातळी गाठली. चांदी नवे विक्रम गाठत असताना रिच डॅड पुअर डॅड या प्रसिद्ध पुसत्काचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे सोने-चांदीबाबतचे भाकित खरे ठरताना दिसत आहे. श्रीमंत होण्यासाठी सोने आणि चांदीतील गुंतवणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे किसोसाकी यांनी म्हटले होते.

चांदीची किंमत सतत वाढत असून सर्व जुने विक्रम मोडत आहे. सोमवारी 4 जुलै रोजी एक्सपायरी असलेल्या चांदीने प्रति किलो 1,05,136 रुपये या पातळीवर व्यवहार सुरू केला आणि तो 1,07,171 रुपये प्रति किलो झाला. फक्त एका दिवसात चांदीच्या किमतीत प्रति किलो 2035 रुपयांची वाढ झाली. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात त्यात थोडीशी घसरण दिसून आली. गेल्या एका महिन्यात चांदीच्या किमतीत झालेल्या बदलांवर नजर टाकली तर 9 मे रोजी त्याची किंमत प्रति किलो 96,729 रुपये होती आणि जूनच्या सुरुवातीलाच ती 1 लाखांच्या पुढे गेली.

केवळ एमसीएक्सच नाही तर देशांतर्गत बाजारातही चांदीची चमक सतत वाढत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन IBJA.Com च्या वेबसाइटनुसार, सोमवारी 1,04,610 रुपयांवर उघडल्यानंतर, संध्याकाळी ती 1,05,285 रुपये प्रति किलोवर पोहोचली. गेल्या काही दिवसांत चांदीच्या दरात लक्षणीय बदल दिसून आला आहे. 3 जून रोजी ते 1,00,460 रुपये प्रति किलो 4 जून रोजी 1,00,980 रुपये प्रति किलो 5 जून रोजी 1,04,675 रुपये प्रति किलो आणि 6 जून रोजी 1,04,675 रुपये प्रति किलो या पातळीवर स्थिर होते, म्हणजेच गेल्या आठवड्याचा शेवटचा व्यापार दिवस होता.

‘रिच डॅड पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी हे दररोज त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून (आता एक्स) गुंतवणूक सल्ला देत असतात आणि सोने, चांदी आणि बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे हे त्यांच्या प्रत्येक सल्ल्यात असते. सुमारे दोन वर्षांपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता आणि त्याला श्रीमंत होण्याचे साधन म्हटले होते. म्हणून अलीकडेच त्यांनी आणखी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी आशा व्यक्त केली होती की या वर्षाच्या अखेरीस चांदीची किंमत दुप्पट होत ती गगनाला भिडणार असल्याचे म्हटले आहे.

कियोसाकी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जगात प्रत्येकाला श्रीमंत होण्याची संधी आहे, मात्र, तरीही लाखो लोक गरीब होत आहेत. शेअर बाजार, बाँड आणि रिअल इस्टेट मार्केटमधील घसरणीमुळे लाखो लोकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे आयुष्याचे सोनं करायचं असेल तर चांदी खरेदी करा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.