
आपल्या बदललेल्या लाइफस्टाइलमुळे आपल्या खाण्या-पिण्यातही बरेच बदल झाले आहेत. आहारातील लक्षणीय बदलामुळे आपल्याला कर्करोगाचा धोका हा वाढू लागलेला आहे. कोणत्याही एका अन्नामुळे थेट कर्करोग होत नसला तरी, काही आहारातील निवडींमुळे धोका लक्षणीयरीत्या वाढू शकतो. एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रशिक्षण घेतलेले कॅलिफोर्नियातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी 9 जूनच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये हे अधोरेखित केले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कर्करोग होण्यास कारणीभूत असलेल्या, अन्नपदार्थांचा समावेश केलेला आहे.

सध्या आपल्या आहारात प्रक्रिया केलेले मांस, साखरेची पेये आणि तळलेले पदार्थ खूप सर्वसामान्य झालेले आहेत. हे अन्न कर्करोगाच्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचे ते म्हणतात. तसेच कर्करोग होण्यास कारणीभूत सॉसेज, हॉट डॉग, बेकन आणि डेली मीट यासारख्या पदार्थांचाही समावेश आहे. सोडा, एनर्जी ड्रिंक्स आणि गोड पेये यांचे नियमित सेवन इन्सुलिनची पातळी वाढवू शकते, वजन वाढवू शकते आणि जळजळ वाढवू शकते, हे सर्व कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस कारणीभूत ठरतात.

एकदा तेल वापरल्यावर, पुन्हा तेच तेल वापरल्यामुळेही ट्रान्स फॅटस् सारखी हानिकारक संयुगे तेलामध्ये तयार होतात. यामुळे आपल्या शरीरात कर्करोगास कारण ठरतील असे घटक वाढीस लागतात. उच्च तापमानात, विशेषतः उघड्यावर शिजवलेले मांस खाल्ल्याने हेटरोसायक्लिक अमाइन (HCAs) आणि पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स (PAHs) सारखे कर्करोगजन्य संयुगे तयार होऊ शकतात. यामुळे आपल्या डीएनएला नुकसान पोहोचते. मध्यम प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने देखील स्तन, यकृत आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढतो.
पॅक केलेले स्नॅक्स, रेडी-टू-ईट पदार्थ, इन्स्टंट नूडल्स आणि साखरयुक्त धान्यांमध्ये बहुतेकदा उच्च प्रमाणात रिफाइंड कार्बोहायड्रेट्स असतात. हे घटक कर्करोगासह अनेक जुनाट आजारांना आमंत्रण देतात.




























































