Simona Halep – हालेपवर चार वर्षांची बंदी, बंदीच्या निर्णयाविरुद्ध दावा करणार

माजी अग्रमानांकित 31 वर्षीय रोमानियन टेनिसपटू सिमोना हालेपवर उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सी (आयटीआयए)ने आज या बंदीची घोषणा केली, मात्र हालेपने या बंदीला आव्हान देणार असल्याचे जाहीर केले.

2022 सालच्या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत ‘रॉक्सडस्टेट’ हे उत्तेजक द्रव्य तिच्या शरीरात आढळले होते. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून तिच्यावर तात्पुरते निलंबन लादण्यात आले होते. या वर्षी मे महिन्यात दोन ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या या चॅम्पियनच्या अथलीट बायोलॉजिकल पासपोर्टमध्ये (एबीपी) अनियमितता आढळून आली होती.  तिच्या घेण्यात आलेल्या चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यामुळे हालेप 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत व्यावसायिक टेनिस स्पर्धा खेळू शकणार नाही.

आयटीआयएने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर हालेपने त्वरितच या निर्णयाविरुद्ध दावा करणार असल्याचे सांगितले. टेनिसच्या उत्तेजक द्रव्यविरोधी कार्यक्रमांतर्गत एका संस्थेने माझ्याविरुद्ध तात्पुरती बंदीची घोषणा केली आहे. गेले वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. या निर्णयाविरुद्ध माझी लढाई मी सुरूच ठेवणार आहे. मी माझे आयुष्य आजवर चांगल्या खेळाला समर्पित केले आहे. मी माझ्या खेळादरम्यान प्रत्येक नियमांचे गंभीरतेने पालन केले आहे. याचा मला गर्व आहे. मी आतापर्यंत कधीही कळत-नकळतपणे कोणतेही उत्तेजक द्रव्य सेवन केलेले नाही. त्यामुळे  मला दिलेली बंदीची शिक्षा मान्य नाही. त्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाणार आहे, असेही हालेप म्हणाली.

हालेपची ग्रॅण्डस्लॅम कामगिरी

हालेप आपल्या मादक सौंदर्यामुळे नेहमीच आकर्षणाचा केंद्र होती. पण जेव्हा ती मादक होती तेव्हा तिची कामगिरी सामान्य होती, मात्र ती आपले वजन कमी करून मैदानात उतरली तेव्हा ती जबरदस्त खेळली. तिने चक्क दोन ग्रॅण्डस्लॅमही जिंकले. तिने आपल्या कारकीर्दीत तब्बल सव्वा वर्ष महिला एकेरीचे अव्वल स्थान कायम राखले. 2018 साली तिने लाल मातीत आपले पहिले ग्रॅण्डस्लॅम जिंकले आणि त्यानंतर 2019 साली तिने हिरवळीवर इतिहास रचताना विम्बल्डनही जिंकण्याचा पराक्रम केला. ती 2018 साली ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेती ठरली होती. तसेच 2015 साली तिने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीतही धडक मारली होती.