
कणकवली येथील रेल्वे स्टेशन परिसराचे गतवर्षी सुशोभिकरण करण्यात आले होते. परंतु आता स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण शनिवारी (07 जून 2025) दुपारी स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड नजीक केलेल्या छताच्या सिलिंगचा काही भाग कोसळला.
रेल्वे स्टेशन परिसराचे गतवर्षी सुशोभीकरण करण्यात आले होते. सुशोभिकरणामुळे स्थानक परिसराला विमानतळाचा लूक प्राप्त झाला आहे. गतवर्षी गवारेड्याच्या पुतळ्याची शेपटी तुटल्याची घटना घडली होती. त्यानंतर सेल्फी पॉईंटमधील लाईट बंद पडली होती. वर्षभरातच रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागात केलेला सिलिंगचा काही भाग कोसळल्याने या कामाच्या दजार्बाबत प्रशचिन्ह निर्माण झाले आहे.
स्टेशन परिसरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. त्याचबरोबर या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, डॉ. प्रथमेश सावंत, सतीश परब, सतीश मर्गज, चंद्रकांत सावंत, किरण रेडकर आदी उपस्थित होते.