
कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना चालू हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असतानाही सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. “बागायतदारांना जोपर्यंत योग्य नुकसान भरपाई मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारने शेतकऱ्यांना नोटिसा बजावून भीती घालण्याचा प्रयत्न करू नये,” असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, संजय नरे, आप्पा चव्हाण यांसह संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले की, २३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता नांदगाव तिठा येथे मुंबई-गोवा महामार्गावर नियोजित ‘चक्काजाम’ आंदोलन ठामपणे पार पडेल. “आम्ही सरकारला १० दिवसांची मुदत दिली होती, मात्र २१ मार्च उजाडला तरी सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. २५ मार्चला अधिवेशन संपत आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी सरकारवर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेट्टी यांनी बागायतदारांसाठी खालील मागण्या मांडल्या आहेत:
- आंबा बागायत: हेक्टरी ५ लाख रुपये किंवा प्रति झाड ५ हजार रुपये मदत.
- काजू बागायत: हेक्टरी ३ लाख रुपये नुकसान भरपाई.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना शेट्टी म्हणाले, “२०१४ मध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्यांवर आता विश्वास कसा ठेवायचा? सरकारने रडीचा डाव खेळू नये आणि आंदोलक शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये.”
बागायतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेवरही शेट्टी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “काही कंपन्या आणि दुकानदार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. कृषी विभागाच्या ‘क्वालिटी कंट्रोल’ टीमने यावर तातडीने कारवाई करावी. औषधांची एमआरपी आणि प्रत्यक्ष मिळणारी स्कीम याचा पंचनामा करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. दुकानदारांनी शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा द्यावी, अन्यथा फसवणूक करणाऱ्यांना सोडले जाणार नाही,” असा सज्जड दमही त्यांनी दिला.



























































