वैभववाडीतून पायी कोकण दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ

ज्ञानोबा, माऊली तुकारामांच्या गजरात वैभववाडीतून पायी कोकण दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. एकात्मता वारकरी संप्रदाय आयोजित कोकण दिंडीचे देवगड-बापार्डे, वैभववाडी ते श्री क्षेत्र पंढरपूर या कार्तिकी पायी वारीचे औचित्य साधत सायंकाळी वैभववाडीत आगमन झाले. येथील संभाजी चौकात पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात सहभागी झालेला अश्व सर्वांचेच आकर्षण ठरला. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि संत नामस्मरणाच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ महाराज गवंढळकर, कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोष राऊळ, खजिनदार हभप मधुकर प्रभुगावकर, सचिव गणपत घाडीगावकर, तसेच सदस्य प्रकाश सावंत व राजेश पडवळ यांनी दिंडीचे स्वागत केले.