बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिकेच्या नावाने बोगस प्रोफाईल, दहशत पसरवण्यासाठी वापर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोटय़वधी बनावट ओळख तयार करून बनावट फॉलोअर्स, कमेंट्स, लाइक्स, व्ह्यूजचा आकडा फुगवायचा आणि अशा बनवेगिरीच्या माध्यमातून सोशल मीडिया प्रोफाइलचा सोशल नेटवर्कमध्ये प्रभाव पडेल असा बोगस देखावा तयार करणाऱया एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता युनिटने पर्दाफाश केला आहे.

bhumi-trivedi-new

बॉलीवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका भूमी त्रिवेदी हिने तिच्या इन्स्टाग्राम अकऊंटवर अज्ञात व्यक्तीने बनावट प्रोफाइल तयार केल्याची तसेच असे भामटे चित्रपटसृष्टीत काम करणाऱया अनेकांना संपर्क साधून त्यांचे इन्स्टाग्राम व फेसबुक अकांऊट खोटय़ा पद्धतीने सक्रिय करण्यासाठी सांगत असल्याची तक्रार पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्याकडे केली होती. याप्रकरणी बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी गुप्त वार्ता विभागाने तपास सुरू केला. प्रभारी इन्चार्ज सचिन वाझे व पथकाने तांत्रिक बाबी व खबऱयांना कामाला लावून सोशल माडियावर अशी बनावटगिरी करणाऱया अभिषेक दवडे (21) या आरोपीच्या कुर्ल्यात मुसक्या आवळल्या. मोठय़ा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फसवणूक करणाऱया टोळीचा अभिषेक हस्तक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोटय़वधी बनावट ओळखी, फॉलोअर्स अन फसवाफसवी
z हे रॅकेट सोशल मीडियावर कोटय़वधी बनावट ओळखी, फॉलोअर्स, कमेंट्स, लाइक्स, ह्यूज अशी बनावटगिरी करतात. अटक आरोपीने आतापर्यंत सोशल मीडियावर त्याच्या 176 प्रोफाइलसाठी पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स तयार केले आणि ते बनावट फाँलोअर्स विशिष्ट सोशल मीडिया प्रोफाइलच्या फॉलोअर्सची बनावट पद्धतीने संख्या वाढवतात. अशा प्रकारे या भामटय़ांची बनावटगिरी सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

सॉफ्टवेअरची मदत
z त्या भामटय़ांनी स्वतः किंवा विशिष्ट पण बेकायदेशीर सॉफ्टवेअरद्ववारे बनावट फॉलोअर्स तयार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अशा सॉफ्टवेअरला बॉट्स म्हणून ओळखले जाते. सोशल नेटवर्कवर अस्तित्वात असलेल्या यंत्रणेत फेरफार करून भामटे बनावट प्रोफाइल पोस्ट करतात. जवळपास 100 पेक्षा जास्त ऑनलाइन पोर्टल्स अशा रॅकेटमध्ये सामील आहेत.

अफवा आणि दहशत पसरवण्यासाठी वापर
बनावट प्रोफाइल आणि बनावट फॉलोअर्सचा वापर समाजात अफवा आणि दहशत निर्माण करण्यासाठी केला जात असल्याचे पुढे आले आहे. देशातील अशा प्रकारच्या 54 पोर्टल गुन्हे शाखेने शोधून काढले आहेत. हिंदुस्थानात पहिल्यादांच अशाप्रकारे सायबर गुन्हे करणाऱया आणि त्याचा आंतरराष्ट्रीय विस्तार असलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या