सरसंघचालक दहशतवादी, योगींना शिवीगाळ; गायिकेच्या वादग्रस्त पोस्टने खळबळ

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड गायिका हार्ड कौर हिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे वादळ उठले आहे. हार्ड कौर हिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंवरून एकामागोमाग एक वादग्रस्त पोस्ट केल्याने नेटिझन्सने तिच्याविरोधात आघाडी उघडली आहे. हार्ड कौरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. यानंतर नेटिझन्सने तिला ट्रोल केले.

हार्ड कौर हिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांना जातियवादी म्हटले. एवढ्यावरच न थांबता तिने देशातील दहशतवादी घटनांमध्ये त्यांचा आणि त्यांच्या संघटनेचा हात असल्याचाही आरोप तिने केला. मुंबईमध्ये झालेला 26/11 दहशतवादी हल्ला असो किंवा पुलवामात झालेला सीआरपीएफच्या पथकावरील हल्ला असो यामागे आरएसएसचा हात असल्याचे तिने म्हटले. यासोबत तिने Who killed Karkare नावाच्या पुस्तकाचा फोटोही पोस्ट केला आहे.

गायिकेने गौरी लंकेश हत्या प्रकरणाबाबतही पोस्ट केल्या आहेत. तसेच योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली आहे. याआधीही तिने राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटींविरोधात गरळ ओकली आहे. ताज्या पोस्टवरून नेटिझन्सने तिच्यावर हल्लाबोल चढवला आहे.