पुढची शंभर वर्षे तरी असा गळा होणे नाही!

>> उषा मंगेशकर, ज्येष्ठ पार्श्वगायिका

लतादीदींच्या गाण्याविषयी मी काय बोलू! दीदींच्या गाण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ते नेमकं काय आहे ते सांगता येणार नाही. मला वाटतं, अजून पुढची शंभर वर्षे तरी असा गायक होणार नाही आणि असा गळाच कुणाला मिळणार नाही. खरं तर हे नशिबानं मिळतं. जरी शंभर वर्षांनी एखाद्याला असा गळा मिळाला तर तो चांगला असू शकतो, पण दीदींसारखा नसेल! दीदी म्हणजे आमची आई, आमचे वडील आणि आमचे पालक. तिने आम्हा भावंडांना मोठं केलं. तिच्यामुळे आम्ही गायला लागलो. तिचं गाणं ऐकून, त्यावर विचार करून तिच्यासारखा गायचा आम्ही प्रयत्न केला. तिच्यासारखं गाणं जमणं शक्य नाही, पण आम्ही प्रयत्न केला. माझ्या पुस्तकात आम्हा पाच भावडांच्या या तर्‍हा मी लिहिल्या आहेत. त्यात माझीही निराळी तर्‍हा वाचायला मिळेल.

दीदीचा 28 तारखेला 91वा वाढदिवस. आम्ही सगळे कुटुंबीय घरी एकत्र आहोत. मुलं रविवारी रात्रीच केक कापणार आहेत. उद्या वाढदिवसाच्या दिवशी घरात दीदींच्या आवडीची पुरणपोळी करू. दीदी काही महिन्यांपूर्वी मोठ्या आजारातून बरी झाली  आहे. त्यामुळे तिची खाण्याची खूप पथ्यं आहेत. याबाबत डॉक्टरांनी वर्षभर तरी काळजी घ्या असं सांगितलं आहे.

दीदी एकदम फ्रेश!

या वयातही दीदी सकाळी लवकर उठते. चहा नाश्ता करून आमच्याशी गप्पा मारते. गाणी, टीव्ही बघते. तिच्यासाठी घरी नर्स आहे. तिला जितकी विश्रांती देता येईल तितकी आम्ही देतो. ती हृदयनाथच्या कार्यक्रमाविषयी बोलते. या कार्यक्रमात यूट्युबवर ती काही गाण्यांवर बोलणार आहे. दीदी एकदम फ्रेश आहे.

शब्दांकन : शिल्पा सुर्वे

आपली प्रतिक्रिया द्या