अमेरिकेत मराठी संस्कृतीचा ठसा उमटवणारे गायक-वादक किरण जोगळेकर यांचे निधन

अमेरिकेत मराठी भाषा, संस्कृती आणि कलेचा ठसा उमटवणारे गायक, वादक, संगीतकार किरण दिनकर जोगळेकर यांचे शुक्रवारी निधन झाले.  ते 57 वर्षांचे होते. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लावणी कार्यक्रमाच्या संगीत संयोजनात त्यांचा सहभाग होता.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते स्नेही होते. जोगळेकर यांच्या निधनाने कलासक्त व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

किरण जोगळेकर गेली 40 वर्षे नोकरीनिमित्त अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये वास्तव्यास होते. त्यांचे शिक्षण दादरच्या बालमोहन शाळेत झाले. त्यांना संगीताची विशेष आवड होती. त्यांनी शास्त्रीय संगीत, नाटय़संगीताचे शिक्षण घेतले होते. ते तबला, मृदुंग, ढोलकी आदी वाद्य वाजवण्यात पारंगत होते. जोगळेकर यांनी अनेक मोठमोठय़ा गायकांना कार्यक्रमात साथसंगत केलेली आहे.

न्यूजर्सी येथील वास्तव्यात जोगळेकर यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळासाठी खूप काम केले. मंडळाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले. अत्यंत मनमिळावू आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेल्या जोगळेकर यांचा जनसंपर्क दांडगा होता. ते प्रसिद्ध गायक महेश काळे यांच्यासोबत ‘स्वर पश्चिमेचा’ हा कार्यक्रम सादर करत. 25 वर्षांपूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हा लावणी कार्यक्रम त्यांनी अमेरिकेतून महाराष्ट्रात आणला. या कार्यक्रमाला जोगळेकर यांनी संगीत साथ केली होती. देशविदेशात या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग झाले. महाराष्ट्रातही त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.

जोगळेकर यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, खासदार राहुल शेवाळे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार सदा सरवणकर, आमदार राम कदम, आमदार  आशीष शेलार, मिलिंद गुणाजी, संजय सुरे, अनिल त्रिवेदी आदींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जोगळेकर यांच्या पश्चात पत्नी अमि आणि मुलगा सोहम असा परिवार आहे.

किरण जोगळेकर म्हणजे खूप आनंदी व्यक्तिमत्त्व. संगीत, नृत्य आणि नाटकाचे अस्सल जाणकार!  माझ्या आयुष्यात दोन व्यक्तींनी मला हसवले,  एक ज्येष्ठ हार्मेनियम वादक पंडित पुरुषोत्तम वालावलकर आणि दुसरे किरण जोगळेकर! जोगळेकर यांच्यासोबतचा अमेरिका दौऱयाचा अनुभव कधीच विसरू शकणार नाही. त्यांच्या निधनाने कलाप्रेमी मित्र गमावला आहे.
– पंडित सतीश व्यास, ज्येष्ठ संतूरवादक

आपली प्रतिक्रिया द्या