पुणे- तेजसाच्या मोबाईलचं गूढ वाढलं, मोबाईल आरोपींनी गायब केल्याचा संशय

2326

नवनाथ शिंदे

सिंहगड रस्ता परिसरातील माणिकबाग येथील इमारतीत राहणाऱ्या उच्च शिक्षित तरुणीचा गळा आवळून खून झालेल्या तेजसा या तरुणीचा मोबाईल गायब करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तिन्हीही आरोपींनी तेजसाचा मोबाईल गायब केल्याचा पोलिसांचा संशय आहे. खुनापूर्वी तेजसाने तिघांशीही व्हॉट्सअ‍ॅपसह इन्स्टाग्रामद्वारे चॅटिंग केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तेजसाच्या मोबाईलमध्ये दडलंय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तिचा मोबाईल मिळाल्यानंतर खुनाला वाचा फुटण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

पीयूष नितीन संचेती (वय 34, रा. चिंतामणीनगर, तुळशीबागवाले कॉलनी), वसंतकुमार प्रभाकर गौडा (वय 31, रा. साकानाका, बंगळुरू), सोनल सुनील सदरे (वय 29, रा. आंबेगाव बुद्रूक, मूळ रा. भराडगल्ली, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांची 10 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. तेजसा शामराव पायाळ (वय 29, रा. फ्लॅट क्रमांक 15, माणिकबाग, मूळ रा. बीड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तेजसाचा 2 डिसेंबरला माणिकबागेतील राधाकृष्ण सोसायटीमध्ये मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनातील प्राथमिक अहवालात तिचा 30 नोव्हेंबरला गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या अंगावर ठिकठिकाणी जखमाही आढळून आल्या होत्या. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजनुसार सिंहगड पोलिसांनी तेजसाच्या घरी गेलेल्या तिन्ही मित्रांना ताब्यात घेत पीयूष, वसंतकुमार आणि सोनलला काल अटक करून न्यायालयात हजर केले.

माणिकबागेतील रामकृष्ण सोसायटीत राहणाऱ्या उच्चशिक्षित तेजसाचा 30 नोव्हेंबरला खून झाला. तत्पूर्वी तिने पीयूष, वसंतकुमार आणि सोनलला व्हॉटसअ‍ॅपद्वारे मेसेज करून घरी बोलविले. त्यानंतरही त्यांच्यात व्हॉटसअ‍ॅपद्वारे चॅटिंग झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. चॅटिंगनंतर तिन्हीही मित्र मोटारीतून सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत गेले. मोटार पार्क करुन तिघेही तेजसा राहत असलेल्या इमारतीच्या आवारात प्रवेश करीत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. त्यानंतर तेजसा, पीयूष, वसंतकुमार आणि सोनलने एकत्रितपणे दारू आणि हुक्क्याने सेवन केले. त्यानंतर तिघेही मित्र तेजसाच्या घरातून बाहेर पडले. मात्र, जाताना त्यांनी तेजसाच्या घराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला.

दरम्यान, 3 डिसेंबरला बंद घरातून वास येत असल्यामुळे रहिवाशांनी पोलीस नियंत्रणक कक्षाला माहिती दिली. त्यानुसार सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश असता खोलीमध्ये बेडवर तेजसाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. खोलीत कपड्यांसह इतर साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. त्यामध्ये दारुच्या बाटल्या, सिगारेटची थोटके, हुक्का फ्लेवरची पाकिटे, रिकामे ग्लास, पांढऱ्या रंगाची ओढणी आढळली. प्राथमिक तपासात तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, ससून रुग्णालयात तेजसाच्या शवविच्छेदन अहवालानुसार तिचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.

आपली प्रतिक्रिया द्या