सिंधुदुर्गात तळपत्या उन्हातही रस्त्यावर ठिय्या; आंबा, काजू बागायतदार नुकसान भरपाईसाठी आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांच्या नुकसानीच्या मागणीसाठी असलदे पेट्रोल पंप येथे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने 11.15 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी विविध नेत्यांनी भर उन्हात मार्गदर्शन केले.

सरकारने आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलन कालावधीत महामार्गावरील पर्यायी रस्त्यांमार्गे वाहतूक वळवली. त्यामुळे राजू शेट्टी यांनी अचानक कणकवलीच्या दिशेने संविनय कायदा भंग आंदोलन म्हणून लॉन्गमार्चची 12.25 वाजता सुरुवात केली. शेवटी प्रशासनाने तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर नांदगाव पाटीलवाडी येथे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

या लॉन्गमार्चमध्ये माजी आमदार वैभव नाईक, बागायतदार संघाचे अध्यक्ष काका ढोके, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक , विजय नाईक , संजय गावडे, एम. के. गावडे यांच्यासह आंबा , काजू बागायतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा , आंबा शेतकरी उपाशी, भोंदू सरकार तुपाशी , कृषिमंत्र्यांच्या करायचं काय खाली डोके वर पाय , जय जय जय जय जय जय भवानी यासह विविध घोषणा देत शेतकऱ्यांनी महामार्ग दणाणुन सोडला.

यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, आंबा ,काजू बागायतदारांसाठी आपण रस्त्यावर बसलो आहे. जोपर्यंत आपल्याला काही ठोस सांगितल्याशिवाय आपण उठायचे नाही. अधिवेशन चालू आहे. सभागृहात लिंगपिसाट खरात बद्दल आवाज उठवला जातो. मात्र, मायबाप शेतकरी रस्त्यावर उतरला त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे.आमची औलाद शिवाजी महाराजांची आहे , आम्हाला गृहीत धरू नका. आम्ही कोणाचाही खेळ बिघडवू शकतो , महात्मा गांधी यांनी आम्हाला सविनय कायदे भंग आंदोलन कसे करायचे , हे शिकवलं आहे. त्यामुळे हे सरकार आम्हा उन्हात बसवून शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे का? हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी जसे, उन्हात एकत्र बसू शकतो, मग आपण 5 ,6 किलो मीटर चालत जाऊन पुन्हा रस्ता अडवू अशी भूमिका मांडली. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहोत, त्यांचेच मावळे आहोत तुम्हालाही कात्रजचा घाट कसा दाखवायचा आणि शाहिस्तेखानाची बोटे कशी छाटायची हे आम्हालाही माहित आहे.

माजी आमदार वैभव नाईक म्हणाले , गेल्या दोन महिन्यांपासून देवगड आणि वेंगुर्ले मधील शेतकरी बागायतदार आंदोलन करत आहेत हे आंदोलन सुरू असताना सरकारने त्याची दखल घेण्याची गरज होती 12 मार्चला काढलेला मोर्चा त्यावेळी रद्द करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी पालकमंत्री ते आले आंदोलन कर्त्यांनी त्यांना सन्मान दिला आणि दहा दिवस उलटले तरी कोणती भूमिका जाहीर नाही. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतील माहिती पालकमंत्र्यांसोबत कोणीही देत नाही. त्यामुळे सरकार मदत देण्यास इच्छुक आहे का ?हा प्रश्न निर्माण होत आहे. एखादा अपघात झाला तर रुग्णवाहिकेला रस्ता मिळत नाही, मात्र दुसरीकडे सरकारने या आंदोलन करताना धडा शिकवण्यासाठी मार्गात बदल केला. मात्र, हे आंदोलन आपण पेटत ठेवायला हवे. आम्ही भाजलेलेच कार्यकर्ते आहोत . भाजलेल्या कोंबड्याला आगीची भीती नाही , आम्ही आंदोलनाचे स्वरूप बदलू योग्य ठिकाणी रस्ता रोको केला जाईल.

नगराध्यक्ष संदेश पारकर म्हणाले, शेतकऱ्यांना सरकारने मदत केली पाहिजे होती. मात्र, त्याउलट सरकारने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.सरसकट कर्जमाफी मिळाली पाहिजे. कोकणातील पिकांना हमीभाव द्या. बोगस औषध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई झाली पाहिजे. माझी सरकारला विनंती आहे, शेतक-यांना मदत करा.माझा स्वाभिमानी शेतकरी पुन्हा मैदानात उतरला आहे. हे आंबा , काजू बागायतदारांवर आस्मानी संकट आले आहे.राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचं दुःख पुसण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आपण त्यांच्या नेतृत्वात लढून न्याय मिळवला पाहिजे.

सुशांत नाईक म्हणाले , आंदोलनाची ही वेळ का आली, याचा विचार करा . पालकमंत्र्यांनी करावा. 12 मार्च च्या आंदोलनाच्या वेळी दोन दिवसांत आश्वासनपूर्ती करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोर झालेल्या बैठकीची भूमिका फक्त पालकमंत्री मांडतात. त्यामुळे नेमकी भरपाई मिळणार का? हे कसं कळणार आज औषध विक्रेते 93 कोटीचा व्यवसायाबाबत बोलत आहेत. हे पैसे शेतकऱ्यांचेच आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातूनही प्रयत्न सुरू आहे, हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, हे यातून सिद्ध होत आहे. या आंदोलनात विविध शेतकरी व नेत्यांनी शेतक-यांच्या समर्थनार्थ मार्गदर्शन केले.