
सराफ बाजारात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सहा बंगाली कारागिरांनी आठ सोनारांना 1 कोटी 1 लाख 5 हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दागिने बनविणे व दुरुस्तीसाठी दिलेले सुमारे 2011 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन सर्व कारागीर कुटुंबांसह पसार झाले आहेत. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना केली असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली. दिपनकर माजी, सोमीन बेरा (कार्तिक), सोमनाथ सामंता, अन्मेश दुलोई, सत्तु बेरा व स्नेहा बेरा अशी गुन्हा दाखल झालेल्या कारागिरांची नावे आहेत. याप्रकरणी सोनार व्यावसायिक कृष्णा जगदीश देडगावकर (वय 32, रा. गायकवाड कॉलनी, सावेडी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कृष्णा देडगावकर यांचे सराफ बाजारात ‘जगदीश लक्ष्मण देडगावकर’ व त्यांचे भाऊ प्रतीक यांचे ‘ए. जे. देडगावकर’ नावाने दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या तळमजल्यावर दिपनकर माजी, सोमीन बेरा (उर्फ कार्तिक), सत्तु बेरा, स्नेहा बेरा हे कारागीर काम करत होते. तसेच, त्यांच्या दुकानासमोर विजय जगदाळे यांच्याकडे सोमनाथ सामंता व अन्मेश दुलाई हे काम करत होते.
रविवारी (दि. 26) सायंकाळी कृष्णा देडगावकर हे कारागीर दिपनकर माजी याच्याकडून तयार दागिने घेण्यासाठी तळमजल्यावर गेले. मात्र, तेथे दिपनकर नव्हता. त्याला फोन केला असता, ‘दहा मिनिटांत येतो’ असे सांगून त्याने मोबाईल बंद केला. यानंतर देडगावकर यांनी सोमीन बेरा व इतरांना फोन केले. मात्र, सर्वांचेच मोबाईल बंद लागले. बराच वेळ होऊनही कोणीच परत न आल्याने देडगावकर यांना शंका आली. त्यांनी सोमनाथ सामंता याच्या रामचंद्र खुंट येथील घरी जाऊन पाहिले असता, घराला कुलूप आढळले.
या कारागिरांनी केवळ देडगावकर बंधूंचेच नव्हे, तर विजय राजाराम जगदाळे, सागर संजय गुरव, भरत दगडूशेठ शिराळकर, बरजहान सुलेमान शेख, प्रमोद आबासाहेब गाडगे, इम्रान आशरफ आली अशा एकूण आठ सोनारांचे एकूण 2011 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत.
घटनेनंतर हे सहा कारागीर, ठेकेदाराची पत्नी व तिचा भाऊ असे एकूण 11 ते 12 जण पळून गेले आहेत. सर्वांनी संगनमत करून हा कट रचल्याचा संशय आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक अमीना शेख तपास करीत आहेत.

























































