मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत आता गुजरातच्या सहा तीर्थक्षेत्रांचा समावेश, ज्येष्ठांना घडवणार सुरतची वारी

राज्यातील ज्येष्ठांना तीर्थदर्शन घडवण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेत आता गुजरातमधील सहा तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मंदिरे आणि तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यातल्या 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडवण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत ज्येष्ठांना राज्यातील विविध मंदिरे आणि तीर्थस्थळांची यात्रा घडवली जाते. आता या योजनेत अन्य राज्यातील मंदिरांचा आणि तीर्थक्षेत्रांचा समावेश केला आहे.

गुजरातची तीर्थयात्रा

या योजनेत दुसऱ्या राज्यातील पंधरा मंदिरांचा आणि तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये ईरानशा अताश बेहरम (उदवाडा, गुजरात), पाक अंजुमन नवसारी अताश बेहराम (नवसारी, गुजरात), कादमी अताश बेहराम (सुरत, गुजरात), मोदी अताश बेहराम (सुरत), पलीथाना (भावनगर, गुजरात), शंखेश्वर तीर्थ (गुजरात) या तीर्थक्षेत्रासोबत महेश्वर खरगोन (मध्य प्रदेश), आग्रा किल्ला (उत्तर प्रदेश), मायाक्कादेवी मंदिर चिंचणी (कर्नाटक), संगोळी रायन्ना नंदगड (कर्नाटक) गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण स्थळ (कुशीनगर, उत्तर प्रदेश), गौतम बुद्धांची साधना भूमी (राजगीर, बिहार), गौतम बुद्धांचे ज्ञानप्राप्तीनंतर सर्वाधिक काळ वास्तव्य (श्रावस्ती, उत्तर प्रदेश), गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले स्थान (सारनाथ नालंदा विहार), वेलंकनी (तामीळनाडू). विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इतर राज्यातील तीर्थक्षेत्रांचा ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजनेत समावेश केला आहे.