
वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा वन्यजीव रक्षक (सातारा) रोहन भाटे व विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, साहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक , वनक्षेत्रपाल आर. आर. पाटील यांना बुधवारी मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी खेड – चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून सहा शिकारी पकडले आहेत. त्यांच्याकडून एक जिवंत दुर्मिळ खवल्या मांजर ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या गुप्त माहिती वरून वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ जिवंत खवल्या मांजर विक्रीसाठी येणार असल्याचे समजले होते. यानुसार खेड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर साईबाबा ढाबा खेड रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचण्यात आला होता. आरोपी जिवंत खवल्या मांजर दुचाकीवरून पोत्यामध्ये लपवून विक्रीसाठी आले होते. त्या पोत्यामध्ये जिवंत खवल्या मांजर असल्याची खात्री झाल्यावर तात्काळ कारवाई करत चार जणांना चार चाकी गाडीमध्येच अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन जणांना 100 मीटर अंतरावरून अटक करण्यात आली आहे.
महेश विजय शिंदे (वय 35, रा.खेड ता.खेड), अंकुश रामचंद्र मोरे (वय 48), समीर सुभाष मोरे (वय 21,दोघे रा. पोखळवणे ता. दापोली), उद्धव नाना साठे (वय 38), अरुण लक्ष्मण सावंत (वय 52, दोघे रा. ठाणे जि ठाणे), अभिजित भार्गव सागावकर (वय 32, रा.सुकवली,ता खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तस्करी करून विक्रीसाठी आणलेले दुर्मिळ खवल्या मांजर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी अधीक तपास सुरू आहे.
या कारवाईमध्ये वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो तथा वन्यजीव रक्षक रोहन भाटे, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, सहायक वनसंरक्षक सचिन निलाख, वनक्षेत्रपाल आर. आर. पाटील, वनपाल खेड अनिल दळवी, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे,आर. आर. शिंदे, द. रा. सुर्वे, अरविंद मांडवकर, सचिन बनकर, व्ही. डी. झाडे सहभागी होते.
खवल्या मांजर ही एक दुर्मिळ सस्तन प्राण्यांची प्रजाती आहे. वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत या प्राण्याला वाघा एव्हढेच संरक्षण दिले गेले आहे. जगात वाघाच्या खालोखाल सर्वात जास्त तस्करी खवल्या मांजराची होते. वन्यजीव अधिनियम 1972 नुसार सात वर्ष सक्त कारावास व 10 हजार रुपये दंड अशी तरतूद आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असेल तर गुप्त माहिती नजीकच्या वनविभागास कळवावे माहीत देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व योग्य बक्षीस देण्यात येईल.
– सचिन निलाख, सहायक वनसंरक्षक, चिपळूण


























































