दुपारची झोप

शिरीष कणेकर < [email protected] >

मी दुपारी गाढ झोपतो (शेवटी जन्म दुपारी 1 ते 4 झोपणाऱया पुण्याचाच नं?). माझी रात्रीची झोप डिस्टर्बड् असते म्हणून तर दुपारी मेल्यासारखा डाराडूर झोपतो. दुपारी मला स्वप्नंही पडतात. स्वप्नात अनेकदा मला साहित्य संमेलनाचं अध्यक्ष करतात, पण (स्वप्नात) माझी भाषणाची वेळ येते तेव्हा मी घाबरून उडी मारून मंचावरून पळून जातो. ‘साहित्यिक मूल्ये’, ‘व्यापक जीवनानुभव’,  ‘वाचक चळवळ’, ‘तळागाळातील शोषित वर्ग’, ‘शब्दसामर्थ्य’, ‘समाजाचं देणं’ हे शब्द पेरून भाषण कसं लिहितात ते मला अवगत नाही. एकदा वाटलं की गेल्या दहा संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचा मसुदा तयार ठेवावा व त्यावरून एक ढाचा बनवावा. भाषण अभ्यासपूर्ण, प्रगल्भ व विचारपरिप्लुप्त होईल, पण स्वप्नातच माझ्या लक्षात येतं की, मी साहित्य शर्विलक नाही. मी दचकून जागा होतो. मला घाम फुटलेला असतो. जणू माझ्या प्राप्तीसाठी कतरिना कैफ आमरण उपोषणाला बसल्येय. काय प्यायला देऊन तिला उपोषण सोडायला लावावं याचा विचार करीत मी पुन्हा गाई गाई करतो. पीयूष द्यावं की उसाचा रस? लिंबूपाणी द्यावं की मसाला दूध? संत्र्याचा रस द्यावा की जलजिरा?…

विचारी माणसं म्हणतात की, दुपारची झोप हा काळाचा अपव्यय आहे. म्हणजे अवघं पुणं वेळेचा अपव्यय करतं? चितळेदेखील? शिवाय काळाचा अपव्यय वगैरे प्रगल्भ मतं मांडणारी विचारी माणसं पुण्यात नाहीत असाही अर्थ त्यातून निघतो. कुमार सप्तर्षीही विचारवंत नाहीत? ते स्वतः दुपारी झोपतात का, हे त्यांच्या खिडकीच्या फटीतून बघायला पाहिजे.

दुपारची झोप अमृततुल्य असते. सगळेच रात्री झोपतात म्हणून नाइलाजाने मी रात्री झोपतो. मी डोळे मिटलेले असले तरी वाघासारखा मी जागाच असतो. अशावेळी माझ्या मिटलेल्या डोळय़ांपुढे माझ्या नावडत्या माणसांचे चेहरे येतात व मी मनातल्या मनात त्यांच्यावर पंजा चालवतो. त्यामुळे माझी रात्र रक्तरंजित होते. दुपारची झोप मात्र शांत, निवांत व सुखकारक असते. जणू जनानखान्यातच झोपलोय. (जनानखान्यात झोपेल कशाला कोणी म्हणा!). रात्री मी छळवणूक केंद्रात असतो तर दुपारी मी ‘जन्नत’मध्ये असतो. दारं-खिडक्या, पडदे लावून खोलीत अंधार करायचा. पंखा फुल सोडायचा आणि मग विच्छेदनासाठी आणलेल्या बेडकाप्रमाणे तंगडय़ा ताणून उताणं झोपायचं. सुख आले माझ्या द्वारी…

माझ्या दुपारच्या झोपेला आता प्रतिष्ठा प्राप्त झालीय (मग मला का होत नाही?). मला ओळखणारी व ओळखत असणारी माणसं मी चारच्या ठोक्याला उठल्यावर मला फोन करतात. माझ्या झोपेची एवढी कदर करणारी माणसं जागेपणी मला काडीची किंमत का देत नाहीत?

इंदिराजींची दिल्लीत हत्या झाली तेव्हा मी मुंबईत माझ्या घरी नेहमीप्रमाणे झोपलेलो होतो. कोणाच्या तरी फोननं मी उठलो. त्याला बातमी कन्फर्म करायची होती. मी म्हटलं, मला काय माहीत? मी झोपलोय. तुम्ही म्हणता तसं घडलं असेल तर आता तो विषय पुढील आठपंधरा दिवस सगळीकडे चघळला जाईल. त्यापासून सुटका नाही. मग आत्ता माझी झोपमोड करून काय साधलंत?…

तुम्ही म्हणाल, काय पत्रकार आहे की काय आहे? नाहीच आहे. खाणं, झोपा सगळं सांभाळून माफक पत्रकारिता केलेला मी छोटा माणूस आहे. मी पत्रकारितेला लांच्छन आहे. माझा जाड चष्मेवाला मित्र म्हणतो की, मी मनुष्यजन्मालाच लांच्छन आहे.

सचिन तेंडुलकर नुकताच खेळायला आला असला आणि माझी झोपेची वेळ झाली तर मी टी.व्ही.वरच्या सचिनला परखडपणे सांगायचो – ‘‘हे बघ सच्चू, मी तुझा खेळ बघावा असं तुला वाटत असेल तर मी झोपून उठेपर्यंत व त्यापुढेही तुला खेळत राहावं लागेल. बहुधा तो खेळत असायचा. गरम चहाचे घोट घेत घेत मी त्याचे फटके एन्जॉय करायचो. सचिनच्या मोठय़ा खेळय़ांचे रहस्य हे आहे. सचिनच्या शतकांचं व द्विशतकांचं श्रेय मला कोणीही – अगदी सचिननंही – दिलेलं नाही, पण श्रेय इज नॉट इंपॉर्टंट. सचिन देशासाठी डोळय़ांचं पारणं फेडणारी मोठी खेळी करणं महत्त्वाचं. विराट कोहलीला तर सांगायलाही लागत नाही. मी झोपून उठलोय अशी अंपायरनं नुसती खूण केली तरी तो भात्यातून बाण काढून सटासट मारतो. यातलाच एखादा बाण अनुष्काच्या काळजात घुसला असावा.

माझा समकालीन साहित्य स्पर्धक विल्यम शेक्सपियर (आम्ही त्याला ‘विलू’ किंवा ‘शेक्सू’ म्हणायचो) लिहून गेलाय- ‘दोन झोपेमधलं स्वप्न म्हणजे आयुष्य’ (‘Life is a dream between a sleep and a sleep’) पण तो हे रात्रीच्या झोपेविषयी बोलला असणार. दुपारची झोप हा रात्रीच्या झोपेवर उतारा असतो. दुपारच्या झोपेत पडलेली स्वप्नं बहुधा खरी होतात. बायकोच्या जिभेला फोड आलेत व त्यामुळे तिला बोलता येत नाहीय हे माझं स्वप्न खरं झालं होतंच की.

एक नरमदिल शायर म्हणतो –

निंद आयी तो ख्वाब आये

ख्वाब आये तो वो आये

और वो आये तो उनकी याद मे

न निंद आयी न ख्वाब आये

आम्हाला असलं काही सुचत नाही. कारण आमच्या आयुष्यात जागेपणी व स्वप्नात कधी ‘वो’ आलेच नाहीत. असाच एकदा मी गाढ झोपेत असताना फोनच्या बेलनं दचकून उठलो. चरफडत मी उठून फोन उचलला.‘‘कणेकर ना?’’ पलीकडून उत्साहानं रटरटलेला आवाज आला, ‘‘महंमद रफीवर एक मोठा लेख लिहा.’’मी फोन आदळला. त्या क्षणी रफीवर लेख लिहून तयार असता तरी मी तो फाडून त्याचे कपटे कपटे केले असते.खरंच सांगतो, अलीकडे मला खूप वाटतं की, दुपारी म्हणून झोपावं व जागच येऊ नये.

आपली प्रतिक्रिया द्या