महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’

93

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी महाराष्ट्राची कन्या क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांच्या हस्ते मंगळवारी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये स्थित भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुख्यालयात आयोजित शानदार कार्यक्रमात केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) किरेन रिजीजू यांनी क्रिकेटपटू स्मृती मंधाना व टेनिसपटू रोहन बोपन्ना यांना वर्ष 2018 चे ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान केले. पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मागील वर्षी 25 सप्टेंबर या राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018’ चे वितरण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी श्रीलंकेत क्रिकेट सामना सुरू असल्याने स्मृती मानधाना या कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. म्हणून त्यांना घोषित झालेला अर्जुन पुरस्कार आज श्री. किरेन रिजीजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मुंबईत जन्मलेल्या 22 वर्षीय स्मृती मंधानाचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले. वयाच्या 9 व्या वर्षीच महाराष्ट्राच्या 15 वर्षांखालील क्रिकेट संघात तिची निवड झाली. वयाच्या 11 व्या वर्षी महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील संघात तिची वर्णी लागली होती. 19 वर्षांखालील संघातून खेळताना तिने गुजरातविरुद्ध नाबाद 224 धावांची खेळी केली होती. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. 10 एप्रिल 2013 ला त्यांनी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. तिने 55 एकदिवसीय सामन्यात 1951 धावा केल्या आहेत. प्रसंगी ऑफ ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या मंधाना हिने हिंदुस्थानी संघात सलामीची फलंदाज म्हणून आपला ठसा उमटविला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या