लातूर जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, सोमवारी रात्री झालेल्या पावसाने पेरणी वाया गेली आहे. यातच पुन्हा लातूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा धोका असून गोगलगायीवर लवकर उपाय करण्याची गरज व्यक्त होत आहे.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायीचा फटका मागील तीन वर्षापासून बसत आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेले सोयाबीन गोगलगाईनी संपवून टाकले होते. लातूर तालुक्यातील मौजे बाभळगाव येथे या वर्षी गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पेरणीपूर्वी गोगलगाईचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. केशवराव साळुंके यांच्या शेतात गोगलगायी मोठ्या प्रमाणात आढळून आल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी राऊत यांनी याला दुजोरा दिला आहे. तसेच गोगलगाय नष्ट करण्यासाठी संबंधित शेतकरी आणि परिसरातील शेतकरी यांचे प्रबोधन केले आहे. गोगलगाय नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिक पण दाखवलेले आहे, असे त्यांनी सांगितले.
बाभळगाव येथील शेतकरी केशवराव साळुंके यांनी सांगितले की, गोगलगाय प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागास कळवले. त्यांनी येऊन पाहणी पण केली आहे. गोगलगायी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बांधावर गुळाच्या गोण्या अंथरण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही गोगलगायी गोळा केलेल्या आहेत. पण इतर कोणी शेतकरी अजून या कडे लक्ष देत नाहीत. गोगलगायीची अंडी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. असेही त्यांनी सांगितले. मागील वर्षी गोगलगाय प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने मेटाल्डिहाईट किटकनाशक वापरले होते. त्यामुळे गोगलगाय प्रतिबंध झालेला होता. गोगलगायी मरत होत्या पण अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा खर्च परवडत नाही, असेही केशवराव साळुंके यांनी सांगितले.
कृषी विभागाने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मेटाल्डिहाईट किटकनाशक पुरवठा केले तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर मिळेलच पण होणारे आर्थिक नुकसान पण टळेल. विद्यमान शासनाचे धोरण पाहता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग ठोस उपाययोजना करणार की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.